Mumbai News : 2019 पासून राज्यभरातील तब्बल 8 हजार 500 निवृत्त एसटी (ST) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महामंडळाकडून अद्याप निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे आणि वेतनवाढ फरकाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी या सेवानिवृत्त कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून खेटे झिजवत आहेत. त्यातच मागील चार वर्षात थकित देणी मिळण्याआधीच 110 हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी. म्हणजेच संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात सेवा देऊन सुद्धा या कर्मचाऱ्यांना हक्काचे थकित पैसे मिळाले नाहीत.
थकित रक्कम मिळण्याआधीच 110 हून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांचा मृत्यू
"संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या 8 हजार 500 निवृत्त एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हक्काचे पैसे महामंडळाकडून थकवण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळवण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, अद्याप महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत," अशी माहिती श्रीरंग बरगे यांनी दिली.
श्रीरंग बरगे यांनी सांगितलं की, "गेल्या चार वर्षात थकित देणी मिळण्याआधीच 110 पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाला. विविध व्याधींनी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठं आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांची थकित देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक आहे. मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही संबंधित रक्कम थकित राहिल्याने निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचारी विविध व्याधींनी आजारी झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही."
चार वर्षांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या एसटी कार्यालयात फेऱ्या
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणजे एसटी बस. एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. परंतु गेल्या चार वर्षांपासून म्हणजेच 2019 पासून महामंडळाच्या साडेआठ हजारांहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम अद्याप मिळालेली नाही. एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 210 कोटी रुपयांची देणी थकित असल्याचं अधिकारी सांगतात. परंतु आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी हे सेवानिवृत्त कर्मचारी एसटी महामंडळाच्या त्यांच्या जिल्ह्यातील विभागीय कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत.
मुख्यमंत्र्याना पत्र
ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही हे खरं असलं तरी जे कर्मचारी सध्या कामावर आहेत त्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकित रक्कमेसाठी सुद्धा एक वेळचा पर्याय म्हणून 210 रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.