बीड : एकीकडे कर्नाटकमध्ये भाजप सरकारची नाचक्की झाली असतानाच महाराष्ट्रातही एका छोट्याशा निर्णयामुळे भाजप सरकार तोंडघशी पडलं आहे. 11 अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यामुळे भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली.

बीड शहरातील स्वच्छतेवरुन काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कक्षात आणि टेबल-खुर्चीवर कचरा टाकून पदाचा अवमान केला होता. या प्रकरणी काकू-नाना आघाडीच्या 11 नगरसेवकांना अपात्र करण्यात आलं. त्यामुळे या नगरसेवकांना आता नगर परिषदेच्या काऊन्सिलमध्येही बसता येणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपात्र नगरसेवकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ नये, अशी मागणी भाजप उमेदवार सुरेश धस यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यामुळे आपल्या विरोधातील मतदान रोखण्यासाठी भाजपने ऐनवेळी जी खेळी केली, ती  सपशेल फोल ठरल्याचे या निर्णयातून पाहायला मिळते.

आठ महिन्यांपूर्वी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या कक्षामध्ये कचरा टाकला होता. त्यामुळे नगराध्यक्षांच्या गटाने याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शनिवारी नगर विकास राज्यमंत्र्यांनी निर्णय दिला आहे. नगरसेवक पद रद्द झाले असले तरी या नगरसेवकांना विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे.

यामध्ये उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक प्रभाकर पोपळे, सय्यद फारुक अली नुसरत अली, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस अहमद, मोमीन अजहरोद्दीन मोमीन नैमुद्दीन, रणजीत बनसोडे या नगरसेवकांचा समावेश आहे.