यवतमाळ : शाळेत फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकासह एका शिक्षकाला विद्यार्थ्याने बेदम मारहाण केली आहे. यवतमाळमधील फ्री मेथाडिस्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली आहे .


विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीत मुख्याध्यापक रवींद्र मॅथ्यू आणि शिक्षक विजय मॅकवान हे जखमी झाले आहेत. दिवाळीनिमित्त आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी काही विद्यार्थ्यी शाळेत फटाके फोडत होते. मात्र विद्यार्थ्यांना फटाके फोडण्यास मुख्याध्यापक रवींद्र मॅथ्यू यांनी विरोध केला.


फटाके फोडण्यास विरोध केल्याने दहावीच्या एका विद्यार्थ्याने रागाच्या भरात मुख्याध्यापकासह एका शिक्षकाला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर विद्यार्थ्यांने शाळेतून पळ काढला. घटनेनंतर काही वेळ शाळेत तणाव निर्माण झाला होता.


मारहाणीत जखमी झालेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. घटनेनंतर मारहाण झालेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाने कोणती तक्रार केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघांनीही आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार द्यायची नसल्याचं पोलिसांना लिहून दिलं आहे.