दापोली: दहावीत 80 टक्के गुण मिळूनही प्राची घडवले नावाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. खरं कब्बडी, वक्तृत्व यात हुशार असणाऱ्या या मुलीनं अपेक्षेपेक्षा पाच टक्के गुण कमी मिळाल्यामुळे आपलं जीवन संपवलं. खरं तर आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचून जाऊ नका. कारण आयुष्यात स्वताला सिध्द करण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही.

 

सोळा वर्षाच्या प्राची घडवलेनं ऐन उमेदीच्या काळात आयुष्य संपवलं. कारण काय तर दहावीत अपेक्षेपेक्षा 5 टक्के गुण कमी मिळाले. प्राचीला दहावीत थोडे-थोडके नाही तर 80 टक्के गुण मिळाले. पण तिची अपेक्षा 85 टक्क्यांची होती.

 

सोबतच्या मैत्रिणींना आपल्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याची बोच प्राचीला सहन झाली नाही. त्यामुळे प्राचीनं टोकाचं पाऊल उचललं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या आपटी इथं ही घटना घडली आहे.

 

प्राची वर्गातील हुशार विद्यार्थिनी. आठवीपासून ती नेहमी पहिल्या तीन क्रमांकामध्ये उत्तीर्ण व्हायची. फक्त अभ्यासातच नाही तर मैदानावरही पटाईत. त्यामुळे शाळेत एक उत्कृष्ट कब्बडीपटू अशी तिची ओळख. ऐवढंच नाही तर तिला वक्तृत्वाची देखील चांगली जाण. त्यामुळे तिनं आपल्या वक्तृत्वानं अनेक बक्षिसं जिंकली.

 

प्राचीच्या घराची स्थिती अत्यंत बेताची. आई मंजुरी करते तर वडील चौकीदारी करुन पोट भरतात. त्यामुळे प्राचीला मिळालेले 80 टक्के गुण घरच्यांसाठी खूप होते. पण प्राचीनं टोकाचं पाऊल उचलून थेट आयुष्य संपवलं.

 

खरं तर आयुष्याची परीक्षा कागदांवरील गुणांवर ठरत नाही. त्यामुळे तिथं कमी गुण मिळाले तरी आयुष्यात यशाचं शिखर गाठता येतं हे अनेकांनी सिध्द केलं आहे. त्यामुळे कमी गुण मिळाले किंवा नापास झालो म्हणून खचून जाऊ नका. स्वत:ला सिध्द करण्याची संधी पुन्हा मिळते. पण आयुष्य नाही.