10th August Headline: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वाच्या प्रस्तावावर (No Trust Vote) आजही हा चर्चा होणार आहे, आज या चर्चेचा तिसरा दिवस असणार आहे. आज पंतप्रधान मोदी (PM Modi) संसदेत या मुद्द्यावरुन प्रत्युत्तर देणार असल्याने तिथे गदारोळ होण्याची शक्यता आहे. आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर केलं जाणार आहे, यातून महागाईचा अंदाज मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज दुपारी बैठक होणार आहे.


आरबीआयकडून पतधोरण होणार जाहीर


आरबीआयकडून आज सकाळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. डाळी, टोमॅटो, कांदा, मसाले आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने मागील महिन्यात महागाईत वाढ झाली होती. अशात महागाई संदर्भात सविस्तर माहिती शक्तिकांत दास यांच्याकडून सादर केली जाणार आहे. अमेरिकी फेडररकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळत असल्यानं आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस


मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधककांडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधकांच्या आरोपांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार आहेत. 


राष्ट्रवादीची (अजित पवार गट) बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गटाची) आज दुपारी 3 वाजता प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महिला अत्याचारांबाबत ठाकरे गट घेणार राज्यपालांची भेट


राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ठाकरे गट राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. दुपारी ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत.


आपच्या खासदारांची सकाळी पत्रकार परिषद


आपचे नेते राघव चड्ढा यांना विशेषाधिकार समितीची नोटीस आली आहे, या प्रकरणी आपचे सर्व खासदार आक्रमक झालेत. आज सकाळी आपचे 10 खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या प्रकरणावर आपली मतं मांडणार आहेत.


विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार विदर्भ दौऱ्यावर


विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज गोंदिया आणि भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची आज बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता विजय वड्डेटीवार पत्रकार परिषद घेतील.