108 वर्षांच्या आजीचा उत्साह, रत्नागिरीत मतदान!
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2017 12:38 PM (IST)
रत्नागिरी: तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह एका 108 वर्षाच्या आजींनी दाखवला. कोकणच्या ग्रामीण भागात सकाळच्या टप्यात संथ गतीने मतदान सुरु झाले होते. यातच रत्नागिरीच्या फणसावळे गावाच्या मतदान केंद्रावर 108 वर्षाच्या दळवी आजी पोहोचल्या. आधारासाठी हातात वॉकर घेऊन आपला मुलगा आणि नातवाच्या बरोबरीने 108 वर्षाच्या या आजी स्वतः चालत रत्नागिरीच्या या मतदान केंद्रावर पोहोचल्या. 108 व्या वर्षीही आजीचा मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. गेल्या काही दिवसांपासून आजी घराच्या मंडळींना मतदानाची आठवण करून देत होत्या आणि आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदानासाठी सज्ज झाल्या होत्या. मतदान महत्वाचे आहे. प्रत्येकाने समजून मतदान केले पाहिजे, असं या आजी केंद्रावर आलेल्या मंडळींना सांगत होत्या. मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुण वर्गासाठी १०८ वर्षाच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.