शिर्डी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचं लोकार्पण झाल्यानंतर दोनच दिवसात विमान कंपनीचा मनमानी कारभार समोर आला आहे. प्रवाशांकडून हैदराबाद आणि मुंबईसाठी मनमानी पद्धतीने भाडं आकारलं जात आहे.
हैदराबादसाठी सुरुवातीला 2200 रुपये भाडं आकारण्यात आलं. मात्र मिळालेला जास्त प्रतिसाद पाहता विमान कंपनीने दुसऱ्या दिवशी हैदराबादसाठी तब्बल 10 हजार 750 रुपये भाडं आकारलं. शिर्डीला येण्यासाठी प्रवाशांचा ओघ वाढू लागल्याने त्याचा फायदा कंपनी घेत आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेत शिर्डी विमानतळाचा समावेश नसल्याचं बोललं जात आहे. या योजनेत शिर्डी विमानतळाचा समावेश झाल्यास प्रवाशांना आणखी फायदा होईल. मात्र दोनच दिवसात कंपनीने केलेली भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं शिर्डीत येणाऱ्या भाविकांचं म्हणणं आहे.
हैदराबादला जाणारं विमान रद्द, प्रवाशांची गैरसोय
विमानतळाच्या लोकार्पणानंतर दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादकडे जाणाऱ्या एअर अलायंस कंपनीच्या विमानाचं उड्डाण रद्द करण्याची वेळ आली. वातावरणातील बदलांमुळे हे विमान रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
हैदराबादहून शिर्डीला येणारं विमान शिर्डीत निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा दाखल झालं. पुन्हा 4.30 वाजता हे विमान हैदराबादसाठी रवाना होणार होतं. मात्र प्रवासी विमानात बसल्यावर प्रवासी आणि लगेज यांच्यात ताळमेळ लागत नव्हता. या सगळ्या घडामोडींमुळे विमानाला विलंब होत होता. त्यातच संध्याकाळची वेळ असल्याने अपुरा प्रकाश आणि हैदराबादमध्ये सुरु असलेला पाऊस यामुळे उड्डाण करण्यास परवानगी मिळाली नाही.
विमानतळावर ताटकळत असलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा शिर्डीत मुक्काम करण्याची वेळ आली. या घटनेनंतर तब्बल दोन तास प्रवासी विमानतळावरच बसून होते. विमानतळावर पाणी किंवा चहाची व्यवस्थाही नसल्याने गैरसोय झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
दरम्यान विमान कंपनीने अखेर अनेक प्रवाशांना शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली. सर्व प्रवाशांना आज सकाळी एकत्र बसमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर हैदराबादसाठी विमान 10.25 वाजता रवाना झालं.
शिर्डी-हैदराबादसाठी 10750 रुपये, विमान कंपनीची मनमानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2017 01:05 PM (IST)
हैदराबादसाठी सुरुवातीला 2200 रुपये भाडं आकारण्यात आलं. मात्र मिळालेला जास्त प्रतिसाद पाहता विमान कंपनीने दुसऱ्या दिवशी हैदराबादसाठी तब्बल 10 हजार 750 रुपये भाडं आकारलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -