मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळल्या असल्या, तरी जोडाव्या लागतात भूतलावर! लग्न जुळवण्यासाठी विविध मॅट्रिमोनी साईट्सवर नोंदणी करणाऱ्या 102 जणांना या वर्षात लग्नाआधीच धोका मिळाला. 102 उच्चशिक्षित महिला आणि पुरुषांची गेल्या आठ महिन्यात फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.


या विवाहोच्छुकांना तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा बसला आहे. यामध्ये मुख्यत्वे विधवा, घटस्फोटित किंवा तिशी ओलांडलेल्या महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षात (2017) मॅट्रिमोनी साईटवरुन फसवणूक झालेल्यांचा आकडा यंदा आठ महिन्यांतच पार झाला आहे.

करिअर किंवा कौटुंबिक कारणांमुळे शहरात लग्न करण्याचं वय लांबत चाललं आहे. त्याचप्रमाणे विधवा-विधुर, घटस्फोटितही दुसऱ्या लग्नासाठी मॅट्रिमोनी साईटवर नोंदणी करतात. या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करुन अशा व्यक्तींना हेरलं जातं आणि विविध शक्कल लढवून लूट करण्यात येते.

परदेशात मोठ्या पगाराची नोकरी असल्याचं बनावट प्रोफाईलवर सांगितलं जातं. महिलांना 'रिक्वेस्ट' पाठवून त्यांच्याशी संपर्क साधायचा. त्यांचा विश्वास संपादन करुन लग्नासाठी मागणी घातायची. त्यानंतर विविध कारणं सांगून महिलांकडे पैसे मागितले जातात.

भारतात आल्यानंतर विवाह करुन पैसे देण्याचे आश्वासन दिलं जातं. तर काही वेळा परदेशातून मोठ्या रकमेचं गिफ्ट पाठवलं असून ते कस्टमने पकडल्याच्या थापा मारल्या जातात. गिफ्ट सोडवून घेण्यासाठी महिला विविध बँक खात्यांत पैसे भरत राहतात. पण गिफ्टही मिळत नाही आणि लग्नाचं आश्वासन देणाराही संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातो. तेव्हा कुठे फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.

मॅट्रिमोनी साइटवरुन फसवणूक करणाऱ्या काही टोळ्यांना सायबर सेलने अटक केली आहे. विशेष म्हणजे काही महिला लग्नाचं आमिष दाखवून नंतर ब्लॅकमेल करायच्या आणि पुरुषांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करायच्या, असंही समोर आलं आहे.

मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय विश्वास ठेवू नये. त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करु नयेत, असं आवाहन सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं आहे. लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. नातेवाईक, मित्र यांच्याशी बोलून खात्री करावी आणि मगच लग्न करावं, असं आवाहन केलं जात आहे.