पंढरपूर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात  बांधावरून होणाऱ्या वादामुळे शेतकऱ्यांचा निम्मावेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टाचे हेलपाटे मारण्यात जातो, असे म्हटलं तरी अतिशियोक्ती ठरणार नाही. ब्रिटिशांच्या काळात झालेल्या बांधाचे पिढ्या वाढतील तसे आडवे-उभे तुकडे पडत गेले. जमीन तेवढीच राहिली, मात्र पिढ्यात वाढत गेल्याने या जमिनीचे तुकडे वाढत गेले आणि त्याच्या जोडीला भाऊ बांधकीचा शाप जमिनी सोबत माणसातही विषारी फुट पाडू लागला. यातूनच बांधाचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले.


 

आज न्यायालयातील बरेचसे दिवाणी दावे निव्वळ बांधावरील वादाचे आहेत. मात्र, बांधाच्या या वादातून कायमची सुटका करण्याचा अनोखा उपाय माढा तालुक्यातील अकोले येथील तोडकरी कुटुंबाने शोधला असून या उपायाने बांधावरच्या भांडणाला पूर्ण विराम मिळाला आहे.



तोडकरी कुटुंबाची अकोले येथे 12 एकर शेती आहे. उजनीच्या जलाशयातील पाण्यामुळे या भागातील शेती समृद्ध झाल्याने येथे इंच-इंच जमिनीसाठी टोकाचे वाद होतात. सोन्याचा भाव असलेल्या या भागात जमिनी मिळविण्यासाठी बडी मंडळी धडपडत असतात. अशा ठिकाणी 12 एकराची शेती जपणे म्हणजे सुळावरची पोळी जपण्यासारखी असते. यामुळेच तोडकरी कुटुंबाने लढवलेली शक्कल खरच अफलातून आहे.

 

तोडकरी यांनी आपल्या  शेताच्या सर्वच बांधावर ठराविक अंतर ठेवत 101 मंदिरे उभारली आहेत. यामुळेच तोडकरी यांना या पंचक्रोशीत ‘मंदिरवाले तोडकरी’ या नावाने ओळखतात. तोडकरी कुटुंबाने आपल्या प्रत्येक बांधावर हि लहान लहान मंदिरांची रांग उभी केली असून, गेल्या 5 वर्षांपासून त्यांचे हे काम अव्याहत पणे सुरु आहे.



आता त्यांच्या शेताच्या सर्व सीमा आणि बंधांच्या वर मंदिरे उभारून पूर्ण झाली आहेत. यामागे या कुटुंबाचे दोन उद्देश सफल झाले आहेत. मंदिरे उभी केल्याने आता तोडकरी यांचा बांध कोणी तोकारात नसून तसे केल्यास मंदिराला धक्का बसेल यामुळे सर्व सीमा आणि बांध तर सुरक्षित झालेच आहेत. याशिवाय एकाच शेतात 101 देवांची मंदिरे झाल्याने दुसरीकडे कोणत्या देवळात जाण्याची  गरजच भासणार नसल्याचे महारुद्र तोडकरी सांगतात.



आपली जमीन म्हणजे आपली आई तिला देवासारखेच महत्व असल्याने शेताच्या बांधावर मंदिरे उभारण्याचा सल्ला त्यांच्या आजोबांनी दिले होते, त्याचेच पालन दोन पिढ्यांच्या पासून हे कुटुंब करीत असून आता शेताच्या बांधावर 101 मंदिरे  झाली आहेत. अजून या मंदिरात देवांची प्राण प्रतिष्ठा केल्या नसल्या तरी या मंदिरात कोण कोणते देव बसवायचे यावर सध्या या कुटुंबात चर्चा सुरु आहे. मात्र तोडकरी यांच्या या मंदिराच्या कल्पनेमुळे आता त्यांच्या मागची बांधावरची भांडणे पूर्णपणे संपली असून शेतातही आता देवांची गल्ली तयार झाली आहे.