जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये गावात होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून दहावीतील एका विद्यार्थिनीनं गळफास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेतून येता-जाता आरोपीकडून प्रेम कर असं म्हणत सतत तिला त्रास दिला जात होता. अखेर या छेडछाडीला कंटाळून मुलीनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं तिच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.


जालन्यातील राणीउचेंगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुलीला आरोपी मनोहर आमले तिची छेड काढायचा. तसंच तू माझ्यावर प्रेम कर म्हणून तिच्या मागे लागायचा. काही दिवसांपूर्वीच त्यानं प्रेम न केल्यास जीवे मारण्याची धमकी या मुलीला दिली होती.

दरम्यान आरोपीने शाळेत जाताना या मुलीचा जबरदस्तीने हात धरत तिची छेडदेखील काढली होती. त्यानंतर आरोपीला जाब विचारला असता त्याने माफी मागून परत हा प्रकार होणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र यानंतरदेखील हा प्रकार सुरुच राहिल्याने तिने घरातील छताला गळफास घेऊन जीवन संपवलं.

आरोपी मनोहर आमलेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे.