बीड : लॉकडाऊनच्या काळात एका शेतकऱ्यांने लाखमोलाच्या उत्पन्न घेतलं आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. बीड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने तर एका एकरातून चक्क दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं आहे. कशी घडली ही किमया पाहुयात.


बीडच्या केज तालुक्यातील डोणगावचे प्रयोगशील शेतकरी धनराज भुसारे यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एक एकरमध्ये शतावरीच्या पिकांमधून भुसारे यांना दहा लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. विशेष म्हणजे भुसारेंनी एका खाजगी कंपनीसोबत यासाठी करार करून या शतावरीची लागवड केली आहे.


धनराज भुसारे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये 1300 शतावरी झाडांची लागवड केली आहे. त्यातील एका झाडाला अंदाजे 20 ते 22 किलो शतावरीचे उत्पन्न मिळतं. समर्थ अॅग्रो कंपनीने 50 रुपये किलो दराने या शतावरीच्या खरेदीचा करार केला आहे. भुसारे यांना 20 ते 22 टन शतावरीचे उत्पन्न अपेक्षित आहे. अंदाजे दहा लाख रुपयांचे उत्पन्न एक एकर शेतामधून भुसारेंना मिळणार आहे.


शतावरीचा वापर मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती म्हणून केला जातो. 18 महिन्यानंतर आता पिक काढणीला आलं आहे. जेसीबीच्या सहाय्याने शतावरीच्या मुळा काढल्या जातात. बीड जिल्ह्यामध्ये 40 शेतकऱ्यांनी करार पद्धतीने शतावरीची लागवड केली आहे

औषधी वनस्पती असलेल्या शतावरीचे कृषी विभागाकडून लावण्याची परवानगी आणि त्यासाठी मार्गदर्शन जर दिलं गेलं तर याचा नक्कीच फायदा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना होऊ शकतो. शतावरीच्या लागवडीतून धनराज भुसारे यांना तर एका एकरामध्ये दहा लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. यासाठी अवघा एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी शतावरीचे पीक घेणे किती फायद्याचे होऊ शकते हे कृषी विभागाने सांगणं गरजेचं आहे.


शेती जगत | शेती क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा |गावागावात काय आहे शेतीची परिस्थिती? 13 जुलै2020