टेमघर धरणातून प्रचंड प्रमाणात पाणी गळती होत असल्याचं सर्वप्रथम 'एबीपी माझा'ने समोर आणलं. 'माझा'च्या पाठपुराव्यानंतर गिरीश महाजन यांनी या गळतीची पाहणी केली. चौकशीनंतर कंत्राटदार आणि अभियंते अशा एकूण 34 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात 25 अभियंते दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र 15 अभियंते सेवानिवृत्त झाले असून, उर्वरित 10 अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियंत्यांवर कारवाई
यामध्ये मोरे (तत्कालीन कार्यकारी अभियंता), आर. बी. गलियान (तत्कालीन उप विभागीय अभियंता) यांच्यासह तत्कालीन शाखा अभियंता व्ही. के. लोमटे, एस. ए. टिळेकर, ब. भि. ढेरे, टी. एस. देशपांडे, एस. डी. कोकाटे, जे. वाय. सूर्यवंशी, एच. के. धामणकर आणि आर. डी. पाटील यांचा समावेश आहे. या सर्व निलंबित अधिकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त,अपील) 1979 च्या नियम 12 आणि 8 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात 20 ऑगस्टच्या पत्रानुसार टेमघर प्रकल्पातील अनियमिततेप्रकरणी मकरंद म्याकल (सहायक अभियंता) यांनी पौड पोलिस ठाण्यात 34 व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. यामध्ये या प्रकल्पाचे कंत्राटदार श्रीनिवास कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांचाही समावेश आहे.
संबंधित बातम्याः