सोलापूर: सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. सोलापुरातील ही वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 26 जुलैपर्यंत 10 दिवस हा लॉकडाऊन लागू असणार आहे. सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळपास 31 गावांमध्ये हा लॉकडाऊन लागू असेल. या दरम्यान दूध, मेडिकल, रुग्णालय या व्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद असणार आहेत. अनलॉकच्या कालावधीत ज्या बाजारपेठा सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व बाजारपेठा 10 दिवस बंद असणार आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सोलापूर शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आला आहेत. शहरात आणि नाकेबंदीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना पासेस देण्यात आलेल्या आहेत. पास व्यतिरिक्त शहरात कोणालाही प्रवेश नसणार आहे. महानगरपालिकेतर्फे या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.

यासाठी पालिकेच्यावतीने 400 लॉकडाऊन असिस्टंट, 26 लॉकडाऊन निरीक्षक, 26 लॉकडाऊन क्षेत्रीय अधिकारी, 26 ल़ॉकडाऊन पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे. नियमांचे उल्लंघन करताना कोणीही आढलल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद देण्याचे आदेश पालिका आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहेत. शहरात लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनचा कामगार नेते नरसय्या आडम यांनी विरोध केला होता. त्यामुळे 10 दिवस हा लॉकडाऊन कशा पद्धतीने राबविला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात या सुविधा सुरु
- दूध विक्रेते यांना घरपोच दुध वितरणासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत परवानगी.
- सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा आणि पशुचिकित्सक सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार
- सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडीत सेवा आस्थापने
- सर्व मेडिकल दुकाने 24 तास सुरु,औषधांशिवाय इतर विक्रीस परवानगी नाही.
- शहरात पोलिस विभागातर्फे संचलित केले जाणारे दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी
- एलपीजी गॅस सेवा घरपोहोच गॅस वितरण
- बँकेच्या सर्व शाखा बंद मात्र एटीएम, काही बँकेचे चेक क्लिअरिंग हाऊसेस सुरु राहणार

लॉकाडाऊनच्या कालावधीत या सुविधा बंद
- सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग संपूर्णत: बंद
- सार्वजनिक/खासगी क्रिडांगणे
- उपहार गृह, लॉज, हॉटेल्स, रिसार्ट, मॉल, बाजार, मार्केट
- सर्व केश कर्तनालय, सलुन, स्पा, ब्यूटी पार्लर
- किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाण, आडत बाजार, फळ आणि भाजी मार्केट, आठवडी व दैनिक बाजार, बाजार समिती
- शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या शिकवणी
- सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहने, बससेवा
- मटन, चिकन, अंडी व मासे विक्री

ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढले

सोलापूर शहरात काल 153 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरातील 3537 जण कोरोनाबाधित झाले आहेत तर 314 रुग्णांनी आपला जीव गमवाला आहे. आतापर्यंत 1976 रुग्ण बरे होऊन परतले असले तरी उर्वरित 1247 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. ग्रामीण भागात देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात 59 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील 1172 जण कोरोना बाधित झाले आहेत. तर 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यामुळे आतापर्यंत 459 रुग्ण बरे झालेत तर उर्वरित 672 रुग्णांवर उपचार सुरू सुरू आहे.