उस्मानाबाद: सध्या आंब्याचा मोसम आहे. बाजारपेठांमध्ये आंबेच आंबे पाहायला मिळतात. पण मोठ्यात मोठा केवढा आंबा तुम्ही पाहिला आहे?

उस्मानाबादमधील एका शेतकऱ्याच्या झाडाला एक फूट लांब आणि तीन ते चार किलो वजनाचे आंबे लागले आहेत. एवढे मोठे आंबे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली आहे.



तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शेतकरी ओम अंगुले यांनी 3 वर्षांपूर्वी केशर आंब्याच्या झाडाची एक एकर लागवड केली.  यंदा त्यांच्या झाडाला मोठ्या प्रमाणात आंबे लागले आहेत. त्यातील एका झाडाला चक्क एक फूट लांब, आणि तीन किलो वजन असे मोठे आंबे लागले आहेत.



दोन हातात न मावणारे हे मोठे आंबे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील झाडाला लागलेले एक फूट लांबीचे आंबे पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

आंबे बघण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची आणि गावातील लोकांची मोठी गर्दी होत आहे. कोण या आंब्यासोबत सेल्फी घेत आहेत, तर कोणी फोटो काढत आहेत.



अंगुले यांच्या शेतातील आंब्याचं झाड मोठमोठ्या आंब्यांनी लगडलं आहे.

पाण्याचे योग्य नियोजन, झाडांची शास्त्रीय दृष्टीकोनातून घेतलेली काळजी आणि निसर्गातील विविध घटकांची योग्य साथ लाभल्यास, असे विक्रमी उत्पन्न सहज पदरात पडू शकते, अशी प्रतिक्रिया अंगुले यांनी दिली.



यंदा त्यांच्या बागेतून एकरी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न मिळू शकेल असा त्यांचा अंदाज आहे.