चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतरची सर्वात मोठी कारवाई आज पोलिसांनी केली. नागालँड राज्याचा पासिंग असलेल्या एक ट्रक दारूसाठा पोलिसांनी जप्त केलाय. त्याची एकूण किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी चालकाला अटक केलीय.


चंद्रपूर शहरालगत असलेल्या मामला जंगलात एक ट्रक संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय. या ट्रकमध्ये अवैध दारूचे खोके खच्चून भरले होते.

पोलिसांनी या ट्रकमध्ये सुमारे 550 पेट्या अवैध देशी आणि  विदेशी दारू जप्त केलीय. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकानं ही कारवाई करत स्थानिक पोलिसांना चांगलीच चपराक दिली आहे.

अवैध दारू आणि ट्रकसह हा एकूण मुद्देमाल 1 कोटींच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ही अवैध दारू नेमकी कुणी मागवली होती, आणि यात किती आरोपींचा सहभाग आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.