Maharashtra Weather Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (26 ऑक्टोबर) देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाने हजेरी लावली आहे.(Rain Today). नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाने काल हलक्या स्वरूपात हजेरी लावल्यानंतर आता पुढील दोन दिवसही पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिकमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
Nashik Rain Update : नाशकात पुन्हा पावसाचा दोन दिवस 'यलो अलर्ट'
नाशिक जिल्ह्यातील विविध भागात रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली. आता पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सध्या कधी कडक उन तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे. नाशिकच्या बागलाण, मालेगाव, चांदवड, नाशिक, दिंडोरी,इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Manmad Rain: मनमाड परिसराला रात्री मुसळधार पावसाने झोडपले, पांझन व रामगूळना नदीला पूर
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मनमाडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. मनमाड व परिसरात काल रात्रीपासून संततधार पडलेल्या पावसाने शहरातील पुन्हा एकदा पांझन व रामगूळना नदीला पूर आला असून या पुरामुळे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तर नदी काठच्या गवळी वाड्यातील काही घरांमध्ये पाणी शिरले असल्याने त्यांची दुभती जनावरे रात्रीतून अन्यत्र हलवावे लागले आहे.
Konkan Rain: सिंधुदुर्गातील पर्यटन ठप्प, मासेमारी देखील बंद
दुसरीकडे कोकणात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात जाणवत आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन ठप्प झालं आहे, तर मासेमारी देखील बंद आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गुजरातसह जिल्ह्यातील मच्छीमारी बोटी देवगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत. तसेच मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे. सध्या सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर तीन नंबरचा बावटा लावला असून समुद्रात मच्छिमारांनी तसेच पर्यटकांनी जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
कापलेले भातपीक आणि मळणी केलेले धान पीक भिजलेत, शेतकऱ्यांची चिंता वाढली
मागील दोन दिवसात भंडाऱ्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. सध्या भातपीक कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. अशात परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं कापणी करून शेतात ठेवलेल्या भात पिकाच्या कडपा पाण्याखाली आल्यात. तर, तर काही भागातील शेतकऱ्यांनी मळणी केलेलं धान शेतशिवारात किंवा घरासमोर सुखवायला ठेवलेले असताना अचानकपणे आलेल्या पावसात ते भिजलेत. कडपा आणि धान पावसात भिजल्यानं याचा फटका धान विक्रीसाठी नेल्यानंतर शेतकऱ्यांना बसेल, अशी आता चिंता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, परतीच्या पावसानं हातात तोंडाची आलेला भात पिकाचं कसं नुकसान झालं याची व्यथा मांडताना शेतकऱ्याचे डोळे पाणावले. दोन दिवसाच्या पावसात भिजलेले धान आज सकाळपासून पुन्हा एकदा शेतकरी सुखवायला धडपड करीत असल्याचं चित्र सर्वत्र बघायला मिळतं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :