Continues below advertisement



Maharashtra Weather Update :  राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. जवळ जवळ सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून सर्वत्र थंडीची लाट (Temperature Drop) पसरल्याचे चित्र आहे. दरम्यान पुढील आठवडाभर मुंबई पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची हुडहुडी कायम असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर वाढत्या थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  सोबतच राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय घसरण होईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.


Maharashtra Weather Update : थंडीचा कडाका अजून वाढणार


राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे मात्र थंडीचा कडाका देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी धुळ्यात 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका अजून वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या असून उबदार कपड्यांच्या विक्रीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.


Parbhani Weather Update : परभणीत थंडीचा कडाका कायम; तापमान 10 अंशाखाली


परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या आठवडा भरापासून थंडीची लाट कायम आहे. तापमान हे 10 अंशखाली गेल्याने प्रचंड गारठा निर्माण झालाय. हवेमध्ये गारवा असल्याने दिवसभर थंडी कायम राहत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, वृध्द,नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर केला जातोय. तसेच सकाळी ग्रामीण भागातून शहरात येणारे दूध विक्रेते, भाजी विक्रेते यांना या थंडीचा जास्त फटका बसत आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटत आहेत. दुसरीकडे रबी पीक ज्यात गहू, हरभरा या साठी ही थंडी पोषक आहे.


Mahabaleshwar: सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांमध्ये आनंद


महाबळेश्वर मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दिवसभर कडक ऊन आणि रात्री गारठा वाढू लागला आहे. या कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारेही वाहूत असल्याने पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिक नागरिक थंडीत गारठले आहेत.महाबळेश्वर शहरामध्ये किमान 10.2अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असून, वेण्णा लेक परिसरात त्याहून तापमानाची कमी नोंद होत आहे.. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळी वेण्णा लेकवर पर्यटक फिरकत आहेत. कडाक्याची थंडी ही महाबळेश्वरची नजाकत दाखवत असून, या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूप आणि सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे.


महाबळेश्वर सोडून काही किलोमीटर अंतर सोडून गेल्यावर बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असलेली गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत. पर्यटकांसह स्थानिकही थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटर, कानटोपी, जॅकेट्सचा आधार घेत आहेत. थंडीचा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, दूध विक्रेत्यांना, औद्योगिक वसाहत मधील कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


Nandurbar : तोरणमाळ येथे 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग


नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला असून थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळ येथे तापमान13 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेल्याने चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला जात आहे. घटत्या तापमानाचा सातपुडा जीवनावर परिणाम होण्यास सुरुवात झाली असून सकाळी उशिरापर्यंत रस्ते ओस पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर रात्रीही थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटताना दिसून येत आहेत. येत्या काही दिवसात तापमान अजून खाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून थंडीचे प्रमाण वाढले असल्याने ग्रामीण भागातही रब्बी हंगामाच्या प्रेरणांनी वेग घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.