Mumbai Rain: राज्यातील अनेक भागात पावसाच्या दमदार (Heavy Rain) सरी कोसळत आहे. अशातच हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत काल (रविवार, 15 जून) रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. सोमवारी पहाटेही पावसाचा जोर कायम होता. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते वाहतुकीची कोंडी होऊ शकते. तसेच लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. परिणामी आठवड्याचा पहिलाच दिवस मुंबईतील चाकरमन्यांसाठी मनस्तापाचा ठरु शकतो. 

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. सोमवारचा दिवस उजाडल्यानंतर मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची दाटी दिसत आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. याचा मुंबईतली जनजीवनावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबईसाठी हवामान विभागाचा अंदाज काय? 

आयएमडीने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे, ज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वादळाचा सेल आठवड्याच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. भरतीच्या चक्रामुळे किनारी आणि सखल भागात पूर येण्याची शक्यता वाढू शकते. रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी आणि त्यांच्या छत्र्या जवळ ठेवाव्यात.

मुंबईत आज (सोमवारी) पहाटे मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला, ज्यामुळे शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला आणि अनेक सखलभागात  पाणी साचलं आहे. पहाटे 2 ते 5 वाजेच्या दरम्यान दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना सर्वाधिक फटका बसला, त्यामुळे हवामान खात्याने दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईच्या फोर्टमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद 

पुढे आलेल्या माहितीनुसार, फोर्टमध्ये सर्वाधिक 74 मिमी पाऊस पडला, त्यानंतर वांद्रे (62 मिमी), मलबार हिल (60 मिमी) आणि लोअर परेल (58मिमी) यांचा क्रमांक लागतो. X (पूर्वीचे ट्विटर) वरील एका अंदाजानुसार, हाजी अली (56 मिमी), माटुंगा (56 मिमी), ग्रँट रोड आणि सांताक्रूझ (प्रत्येकी 47 मिमी) आणि दादर (41 मिमी) या भागात लक्षणीय पाऊस पडला. तर दुसरीकडे कमी प्रभावित भाग असलेल्या अंधेरीत (33 मिमी), मुंबई सेंट्रल (30 मिमी) आणि बोरिवली (28 मिमी) या भागातही सातत्याने पाऊस पडला. वरळी (26  मिमी), बीकेसी (25 मिमी), वर्सोवा (23 मिमी) आणि दिंडोशी (22 मिमी) येथेही पावसाचा जोर बघायला मिळाला.

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा धुमाकूळ 

सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून आता देखील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे समुद्र देखील खवळलेला आहे. किनाऱ्यावर ताशी 40 ते 50  किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे, तरीदेखील काही मच्छीमार आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करत आहेत. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या