Maharashtra Rain मुंबई : राज्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही भागात मात्र अद्यापही पावसाचे सावट आहे. अशात पावसासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदा नोव्हेंबर महिना देखील पावसाचाच असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागकडून वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Rain : राज्यासह संपूर्ण देशात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
परिणामी, राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर कमी असणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा आॅक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीच्या 5 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागकडून देण्यात आलीय.
Maharashtra Floods : केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण
केंद्रीय पथक महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे. हे पथक प्रामुख्याने मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागावर लक्ष केंद्रित करणार असून, केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय (R. K. Pandey) या पथकाचे नेतृत्व करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय यांच्या नेतृत्वाखालील या पथकात आठ जणांचा समावेश आहे. हे पथक ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होऊन, मंगळवार आणि बुधवारी विविध नुकसानग्रस्त भागांना भेटी देईल. या पाहणी दौऱ्यानंतर एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, ज्याच्या आधारावर पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Price Hike: खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री, Paplet 2000 रुपयांवर, सुरमईच्या दरातही मोठी वाढ!
राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मासळीच्या (Fish) दरात मोठी वाढ झाली आहे. सुरमई (Surmai), पापलेट (Paplet), कोळंबी (Prawns) आणि बांगडा (Mackerel) यांसारख्या लोकप्रिय माशांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या दरवाढीबाबत रिपोर्ट सांगतो की, 'पपलेट एक ते दोन हजार रुपये दर अंदाजे प्रति किलो आहेत तर सुरमई पाचशे ते बाराशे रुपये असा भाव पाहायला मिळतोय'. अरबी समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे मच्छीमार समुद्रात जाऊ शकलेले नाहीत, ज्यामुळे मासळीची आवक जवळपास थांबली आहे. याचा थेट परिणाम मुंबईसह राज्यभरातील मासळी बाजारांवर झाला असून, दर दुप्पट ते तिप्पट झाले आहेत. या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांनी महागड्या माशांकडे पाठ फिरवून कमी किमतीत मिळणाऱ्या लहान माशांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे.
Bhandar Rain : परतीच्या पावसानं भंडारा जिल्ह्यातील 18 हजार हेक्टरमधील पिकांचं नुकसान
भंडारा जिल्ह्यात 27 ते 31 ऑक्टोंबर या पाच दिवसात परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. परिपक्व झालेला आणि हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल समोर आला असून यात जिल्ह्यातील 474 गावातील सुमारे 43 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. 18 हजार हेक्टर क्षेत्रातील भातपीक आणि भाजीपाला पिकांना याचा चांगलाचं फटका बसला आहे. या परतीच्या पावसाचा भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भंडारा जिल्हा प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतीचे तातडीनं पंचनामे करायला सुरुवात केली असून अंतिम अहवाल राज्य सरकारकडे तातडीनं पाठविण्यात येणार आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका साकोली तालुक्याला बसला असून 25,730 शेतकऱ्यांच्या 9 हजार हेक्टरमधील भातपीक आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आकडेवारीत अंतिम अहवालानुसार आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली आहे.