Heavy Rain in Nagpur : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यात एका रात्रीत सरासरी 140 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर काल(8 जुलैला) रात्रभरात नागपूर (Nagpur) शहरात तब्बल 150 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. जिल्ह्यात 30 ते 40 लोकांना रेस्क्यू केले असून सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. 

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात 23 ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने ते मार्ग बंद करावे लागले आहे. कळमेश्वरमध्ये एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. हवामान विभाग आजसाठी रेड अलर्ट दिला आहे. उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज संध्याकाळपर्यंत आल्यानंतर शाळा, महाविद्यालय यांना उद्यासाठीपण सुट्टी द्यावी का? याचा निर्णय संध्याकाळी उशिरापर्यंत घेतला जाईल. असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) म्हणाले. 

गरज भासल्यास NDRF आणि आर्मीचीही मदत घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहे. गरज भासल्यास NDRF आणि आर्मीचीही मदत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र सध्या परिस्थिती तशी नसून पूर्णपणे नियंत्रणात आहे. दरम्यान, नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. पूर बघायला  जाऊ नये, स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी रातोरात दाराच्या उंबरठ्यावर बांधली तात्पुरती भिंत

नागपूरच्या बेसा भागात अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. मात्र काही नागरिकांनी घरात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी पावसाचा जोर वाढताच रातोरात दाराच्या उंबरठ्यावर तात्पुरती दोन फूट उंचीचे काँक्रीटची सुरक्षा भीत बांधली. त्याचा सकारात्मक फायदा देखील झालाय. नागरिकांना आपल्या घरात पाणी शिरण्यापासून बचाव करता आला. पावसाळा संपला कि दाराच्या उंबरठयावरची भिंत काढून टाकणार असल्याचे खडतकर कुटुंबियांनी सांगितले.

नाल्याचे पानी थेट शाळेच्या मुख्य दारातून बाहेर

नागपूरच्या बेसा भागातील स्कुल ऑफ स्कॉलर हि शाळा पुराच्या पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे बाजूने वाहणारा नाला हा थेट शाळेच्या मैदानातून मार्ग काढत शाळेच्या मुख्य दारातून बाहेर वाहत आहे. सुदैवाने पावसाचा धोका लक्षात घेता आधीच जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी दिल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आजच्या पावसात  हि शाळा पाण्याखाली गेली अशून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या