Maharashtra Weather Update : राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. बहुतांश ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. अशातच पूर्व विदर्भाला (Vidarbha Weather) गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. गोंदिया जिल्ह्यात काल (28 एप्रिल) पुन्हा वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट व जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेला गारपिट व अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचे धान पीक आणि मका पिक हे आता कापणीला आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा पाऊस असून याचा फटका शेतकऱ्यांना पडत असल्याचे चित्र आहे.
वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक घरांचे व पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यात चिखली येथील खुशाल भेंडारकर यांच्या घरावरील छत उडाले आहे. तर एक झाड उन्मळून पडले असून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गारपीट झाली आहे. तर दुसरीकडे चिखली गावातील विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय.
आमदार बडोले यांनी केली नुकसानीची पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश
गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान आमदार राजकुमार बडोले यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून, नुकसान ग्रस्त पिके व घरे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे सडक अर्जुनी तालुक्यात शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वांच्या सहकार्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर अहवाल सादर केला जाणार आहे.
वादळी वाऱ्याचा आंबा पिकाला फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा पिक झाडांवरून गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरी तालुक्यात अनेक भागात आंबा पिकाच्या बागेमध्ये अक्षरशः आंब्याचे खच पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या