Pandharpur Vidhan Sabha : एका घरात राहताना सुद्धा भांड्याला भांडे लागतात तसा तो प्रकार झाला होता. मात्र, आजच्या बैठकीने सर्व दुरावे गैरसमज संपले असून या विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवू, असा दावा आमदार समाधान आवताडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या तिकिटासाठी रस्सीखेच होती. परिचारक हे तुतारी हातात घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना बंडखोरी शांत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक समर्थक आणि अवताडे यांची एकत्रित बैठक घडवून आणली. बंद खोलीत झालेल्या या बैठकीचा शेवट गोड झाला असला तरी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नव्हती. ती स्थिती परिचारक समर्थकात होती. गेले दोन महिने प्रशांत परिचारक हे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात गावोगावी फिरून मतदारांचा कानोसा घेत होते. 


परिचारकांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे विमानाने सोलापुरात 


परिचारक रिंगणात उतरणार म्हणून भाजपनेही अवताडे यांचे तिकीट थांबवून ठेवले होते, तर अजूनही महाविकास आघाडीतील उमेदवाराची घोषणा झाली नव्हती. परिचारकांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे खास विमानाने सोलापुरात येऊन त्यांनी पंढरपूरमध्ये परिचारकांच्या निवासस्थानी बंद खोलीत जवळपास दोन तास बैठक घेतली. या बैठकीत परिचारक समर्थकांनी अवताडींवर असलेली आपली नाराजी बोलून दाखवली. यानंतर आमदार आवताडे यांना परिचारक यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आले व पुन्हा बंद खोलीत अवताडे आणि परिचारक समर्थकांची बराच वेळ चर्चा झाली.  या चर्चेनंतर दोघातील वाद संपल्याचे दाखवण्यासाठी बावनकुळे यांनी दोघांनाही एकत्रित घेत अवताडे निवडणूक लढवतील असे जाहीर केले. यावेळी परिचारक यांच्या तोंडावरची नाराजी त्यांना लपवता येत नव्हती आणि हीच भाजपची डोकेदुखी ठरू शकते. परिचारक समर्थक काही मोठ्या प्रमाणात या बैठकीनंतर नाराज दिसून आल्याने आता खऱ्या अर्थाने यांचे मनोमिलन झाले का हा प्रश्न बाकी आहे.  


कार्यकर्त्यांची समजूत आणि जोमाने कामाला लागू


माझाशी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी आमच्यातले गैरसमज संपले असून आमच्या दोघात द्वेषाची भावना कधी नव्हती अशी सारवासारव करीत परिचारक आणि आपण मिळून पंढरपूर मंगळवेढ्यात ऐतिहासिक विजय मिळवू असा दावा केला. दुष्काळी मंगळवेढ्याच्या गावोगावात पाणी पोचवून मंगळवेढा हिरवागार करायचे स्वप्न आम्ही या वेळेला पूर्ण करत असून 24 गावांच्या योजना असेल किंवा ठीक ठिकाणी मंजूर झालेली बंधारे असतील. यामुळे मंगळवेढ्याचा दुष्काळी हा डाग उचला जाईल असेही त्यांनी सांगितले.  परिचारक यांनी मात्र सावध भूमिका घेत आपल्या आमदारकी पेक्षा पक्ष मोठा असून कार्यकर्त्यांची समजूत घालून जोमाने कामाला लागू असा दावा केला आहे. या बैठकीमध्ये परिचारकांना लवकरात लवकर विधानपरिषद देण्याचा शब्दही दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आता या दोघात झालेले मनोमिलन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार का हाच प्रश्न असणार आहे. त्यामुळेच याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जाणार का हेही येत्या प्रचारात दिसून येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या