नंदुरबार/धुळे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे. या गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. डोळ्यांसमोर पिकं उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत.


वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे काढणीसाठी आलेले गहू खराब झाले आहेत तर पपई बागांचे आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे


एकीकडे शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. या सुलतानी संकटाचा सामना करत असताना आता गारपिटीचं अस्मानी संकट आले आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन गेलं. रब्बी हंगामातील या पिकांकडून अपेक्षा होती ती डोळ्यादेखत मातीमोल झाली. आता तरी सरकारने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे.


धुळ्यातही पावसामुळे गहू-हरभरा पिकाचं नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. एकीकडे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून नेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला आहे. खरंतर वाढत्या उकाड्यापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पिकांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे


राज्यात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता
देशाच्या मध्यवर्ती भागात पूर्वेकडील वाऱ्याच्या संगम झाल्यामुळे येत्या तीन दिवसात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेशात गडगडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 (आज) आणि  9 (उद्या) मार्चला मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. सध्या कोकणासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने कमाल तापमान घसरले आहे.