Aurangabad Water Issue : औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु या मोर्च्याला अजूनही परवानगी मिळाली नसून आज रात्रीपर्यंत या मोर्च्याला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांकडून काही अटी-शर्ती देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तर परवानगीबाबतचा अंतिम निर्णय औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता घेणार असून परवानगीची फाईल त्यांच्याकडे पोहचली असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन औरंगाबाद शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याच मुद्यावरून भाजपाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सतत आंदोलन केले जात आहे. त्यांनतर आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा; काढण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्नही भाजपाकडून केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
असा असणार मोर्चा....
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजता हा मोर्चा शहरातल्या पैठणगेट येथून निघणार असून महानगरपालिका कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. यावेळी भाजपचे खासदार,आमदार ,माजी नगरसेवक यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेची सावध भूमिका....
शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून सर्वसामन्य नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यात भाजपकडून सेनेला घेरण्याचा केला जात असेलेला प्रयत्न पाहता शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. म्हणूनच पालकमंत्री सुभाष देसाईंनी पाणी पट्टी ५० टक्क्यांनी कमी केली आहे. तर पाणी प्रश्नावरून शिवसेनेवर आरोप करणारे भाजपा महानगरपालिकेत सत्तेत सोबत होती. त्यामुळे त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेकडून बोललं जात आहे.