मुंबई: तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.


तर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या म्हणजे 100 टक्के मागण्या पूर्ण झाल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आझाद मैदानावर केली.

सरकारकडून चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे आणि गिरीष महाजन हे तीन मंत्री आझाद  मैदानावर  आले. सरकारकडून चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं.

त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार जे पी गावित यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या लेखी आश्वासनाचं वाचन केलं.

वनजमिनीबाबत महत्त्वाचा निर्णय झाला.

वनजमिनीबाबत येत्या 6 महिन्यात निर्णय घेतला जाईल. त्यासाठी मंत्र्यांच्या समितीची स्थापना करण्यात येईल. ही समिती त्याबाबत पाठपुरावा करेल, ही मुख्य मागणी शेतकऱ्यांची होती.

शेतकऱ्यांनी लिहून घेतलं

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने लेखी ड्राफ्ट तयार केला. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक हा  ड्राफ्ट घेऊन आले. हा ड्राफ्ट शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात येणार आहे.

सरकार-शेतकऱ्यांमधील बैठकीत काय झालं?

- वन जमिनीबाबत सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणार

- जीर्ण झालेले रेशन कार्ड तीन ते सहा महिन्यात बदलून देणार

- आदिवासी भागात रेशन कार्ड 3 महिन्यात बदलून मिळणार

- अन्य भागत सहा महिन्यात मिळणार

-वन हक्क कायद्याखलील अपात्र दावे पुढच्या 6 महिन्यात निकाली करणार

-अपात्र प्रकरणे पुन्हा तपासू

- 2006 पूर्वी जितकी जागा असेल ती परत देऊ

-गहाळ झाल्याचा पुरावा असेल तर तो ही ग्राह्य धरू



चर्चा सकारात्मक: गिरीश महाजन

सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेतून शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे. त्यामुळे हे आंदोलन लवकरच मागे घेतलं जाईल. शेतकऱ्यांच्या जवळपास 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाला दिली.

तीन तास चर्चा

शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारचं प्रतिनिधी मंडळ यांच्या सुमारे तीन तास चर्चा झाली. सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, आदिवासाी विकास मंत्री विष्णू सावरा, आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

तर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात किसान सभेचे सचिव अजित नवले यांच्यासह  12 जणांचा समावेश होता.

लाल वादळ पहाटेच आझाद मैदानात

विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला. आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास किसान सभेचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं.

सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी रात्रीत कूच करण्याचा निर्णय घेतला.

आज दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते आंदोलकांनी मान्य केलं.

दरम्यान, पाहटे आझाद मैदानात जाऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मुंबईकरांची कोंडी टाळण्यासाठी शेतकरी भल्या पहाटेच आझाद मैदानाकडे निघाले, त्याबाबत त्यांचं आभार मानावं तितकं कमी आहे, असं महाजन म्हणाले.

LIVE UPDATE








      • सरकार-शेतकऱ्यांमधील बैठकीत काय झालं? -वन जमिनीबाबत 6 महिन्यांच्या आत निर्णय घेणार -जीर्ण रेशन कार्ड तीन ते सहा महिन्यात देणार -आदिवासी भागात रेशन कार्ड 3 महिन्यात बदलून मिळणार - अन्य राज्यात सहा महिन्यात मिळणार -वन हक्क कायद्याखलील अपात्र दावे 6 महिन्यात निकाली काढणार

      • शेतकरी आणि सरकार यांच्यातील बैठक संपली, वन जमिनीबाबत सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणार, मंत्रीगटाची समिती या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार

      • खासदार पूनम महाजन यांनी किसान आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध, माफीची मागणी

      • स्वाभिमान दूर ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, राहुल गांधींचं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन



       

      • शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, पण यानिमित्तानं शहरी माओवाद डोकावतोय का ते पाहावं लागेल - भाजप खासदार पूनम महाजन 







    • शेतकरी नेते बैठकीसाठी विधानभवनात पोहोचले, थोड्याच वेळात सरकार आणि शेतकरी नेत्यांची चर्चा

    • थोड्याच वेळात सरकार आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा

    • मुंख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन

    • "महत्वाच्या मागण्या घेऊन मोर्चा नाशिकमधून आला. 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी मोर्चात सहभागी आहेत. सुरुवातीपासून मोर्चेकऱ्यांशी सरकार संपर्कात आहे.मात्र ते मोर्चावर ठाम होते.शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना अडथळा न आणता मोर्चा काढल्याबद्दल त्यांचं कौतुक.वनजमिनीचा हक्काचा प्रश्न प्रमुख आहे. सरकार सकारात्मक आणि संवेदनशील आहे. आम्हाला समर्थन देता येत नाही निर्णय घ्यावा लागतो याची पूर्ण जाणीव आहे.त्यांच्या मागण्यांवर टाइम बाऊंड तयार करण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे.  त्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल सरकार घेणार" - मुख्यमंत्री






  • देणारी सगळी खाती भाजपकडे आहेत, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री सगळे त्यांचे, आम्ही टेबलं आपटून कॅबिनेटमधे आवाज उठवतोय हे महत्त्वाचे: शिवसेना खासदार संजय राऊत

  • मुख्यमंत्र्यांची उच्च स्तरीय मंत्रीगटासोबत विधिमंडळात बैठक सुरु. चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, विष्णू सावरा, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित. किसान मोर्चाच्या मागण्यांवर होणार चर्चा

  • कवी अरुण पवार यांची कविता



सरकारने आता जर ठोस भूमिका घेतली नाही, तर शेतकऱ्यांचा हा ज्वालामुखी सरकारला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी पायपीट करत आहेत, मात्र काल रात्री मंत्रीगट स्थापन केला गेला. हे सरकार इतके दिवस काय झोपा काढत होतं का?

  • सोंग घेतलेलं सरकार आता खडबडून जागं झालं आहे - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील


  • शेतकऱ्यांच्या मोर्चात जाणं म्हणजे गिरीष महाजनांची नौटंकी, मोर्चात जाण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये बसून निर्णय घ्या - अजित पवार

  • आझाद मैदानात मुंबई मनपाकडून जय्यत तयारी, अनेक रुग्णवाहिका मैदानात, रक्ताळलेले पाय घेऊन शेतकरी मोर्चात

  • मुस्लिम संघटानंकडून शेतकऱ्यांना पाणी, बिस्किटांचं वाटप

  • आझाद मैदानात मुंबईकरांचा शेतकऱ्यांन मदतीचा हात

  • किसान सभेचं शिष्टमंडळ आणि सरकारमधल्या बैठकीच्या वेळेत बदल, बैठक दुपारी 2 वाजता होणार, दुपारी 11 वाजता विधिमंडळात कै. पतंगराव कदम यांचा शोक प्रस्ताव आणि 12 वाजता राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने, दोन तासांनी बैठक पुढे ढकलली.

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तयार : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

  • हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढू : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील


 

आज दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते आंदोलकांनी मान्य केलं.

शेतकऱ्यांचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं

दरम्यान, पाहटे आझाद मैदानात जाऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मुंबईकरांची कोंडी टाळण्यासाठी शेतकरी भल्या पहाटेच आझाद मैदानाकडे निघाले, त्याबाबत त्यांचं आभार मानावं तितकं कमी आहे, असं महाजन म्हणाले.

आझाद मैदानात भव्य सभा

आज आझाद मैदानात मोर्चेकऱ्याची भव्य सभा होणार आहे.  किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते सभेत सहभागी होणार आहेत. आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सिस्ट) नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.

गेल्या महिन्यात आमरा राम यांनी राजस्थानमधल्या मोठ्या किसान आंदोलनाचं नेतृत्व करत राजस्थान ठप्प केलं होतं. त्यानंतर ते आता राज्याची राजधानी मुंबईत शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित करणार आहेत.

सरकारकडून समिती स्थापन

मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींशी आज दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहे.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचं लाल वादळ आझाद मैदानावर धडकलं

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

राज ठाकरे किसान मोर्चात सहभागी, शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर


राज ठाकरेंचा नवलेंना फोन, किसान लाँग मार्चला पाठिंबा