जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच दिंडोरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले होते. आता जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून (Erandol Assembly Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील (A T Patil) देखील नॉट रिचेबल असल्याचे महायुतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. 


ए. टी. पाटील काय निर्णय घेणार?


एरंडोल मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाले असून त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज माघारीचा शेवटचा दिवस असून आज सकाळपासून ए टी पाटलांचा मोबाईल स्विच ऑफ असून ते जिल्ह्याच्या बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. ए. टी. पाटील शेवटच्या क्षणी माघार घेतात की? निवडणूक लढवणार ठाम राहतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकमध्येही नॉट रिचेबल उमेदवारांमुळे महायुतीची धाकधूक


शिवसेना शिंदे गटाने देवळालीमध्ये राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. दिंडोरीतून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात माजी आमदार धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्या विरोधात माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र राजश्री अहिरराव आणि धनराज महाले नॉट रिचेबल असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. राजश्री अहिरराव आणि धनराज महाले नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मनोज जरांगेंच्या भूमिकेवर शरद पवार स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरेंकडूनही बंडखोरांना थेट इशारा


सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा; बाळू भेगडेंनी घेतली भेट