मुंबई: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी झालेल्या मारहाणीनंतर राज्यात अनेक घटना घडामोडी घडल्या. आज त्यात नवीन वळण आले आहे. सुरज चव्हाण याने माझ्यावर प्राण घातक हल्ला केला. पोलिसांचा जावई असल्यासारखा तो येतो काय आणि जमानत घेऊन जातो काय, सगळंच वाईट आहे. विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवर याबाबत कारवाई होत नाही. मात्र सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन देणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी कार्यकर्त्यावर प्राण घातक हल्ला होतो. हे योग्य नाही. यामुळे मी आत थेट मुंबईकडे निघालो आहे. अजित पवार यांनाच मी याबाबत जाब विचारणार असे म्हणत विजयकुमार घाडगे यांनी हॉस्पिटलमधून थेट ॲम्बुलन्समध्ये बसत मुंबईकडचा प्रवास सुरू केला आहे.
सुरज चव्हाण यांच्यासह 11 लोकांवर गुन्हा दाखल
विजयकुमार घाडगे यांना रविवारी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन दिल्या कारणाने त्यांना मारहान झाली होती. याप्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह 11 लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. यातील नऊ लोकांना ताब्यात घेत कारवाई करून सोडून देण्यात आलं. अवघ्या दोन तासांमध्ये ही लोक बाहेर पडली. यामुळे छावा संघटनेतील कार्यकर्ते संतप्त झाले. मारहाण झाल्यापासून आजतागायत छावाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्ता उतरून आंदोलन करत होते. लातूर शहर बंदच आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे औसा उदगीर अहमदपूर रेनापुर निलंगा या ठिकाणी ही बंद आणि आंदोलन झाली. मराठवाड्यातील अनेक शहरात त्याचे पडसाद उमटले होते.
सुनील तटकरे हे दादाला भेटतांना समोर यावेत
विजयकुमार घाडगे यांनी बोलताना म्हटलं की, सातत्याने माझ्यावर अन्याय झाला आहे. मी निवेदन दिलं तर मला मारहाण झाली. निवेदन देताना प्रत्येक पत्ते फक्त टेबलवर टाकले होते. मला जबर मारहाण झाली प्राण घातक हल्ला झाला. मात्र विधिमंडळात आसंवेदनशील असलेले कृषिमंत्री कोकाटे हे मोबाईलवर पत्ते खेळताना दिसत आहेत. त्यांचा राजीनामा मागितला म्हणून मला मारहाण झाली. याचा जाब मी त्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनाच विचारणार आहे. मी शिवीगाळ केली वाईट वागलो असं बोललं जात आहे. सुनील तटकरे हे दादाला भेटतांना समोर यावेत. मी काय वाईट वागलो ते त्यांनी तिथे सांगावं. संपूर्ण जिल्ह्याचा मीडिया तिथे त्यावेळी हजर होता. या सगळ्या गोष्टीचा जाब मी दादांनाच मुंबईला जाऊन विचारणार आहे, असं म्हणत विजयकुमार घाडगे हे मुंबईकडे निघाले आहेत. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराची सर्व साधने काढत त्यांनी स्वीट ॲम्बुलन्समध्ये बसून मुंबईकडे प्रयाण केला आहे. यावेळी मराठवाड्यातील अनेक भागातील आलेले पदाधिकारी त्याच्या सोबत निघाले आहेत.