लातूर :  कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेने विद्यार्थी हक्क महामोर्चा काढला होता. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी केले होते. राज्यातील अनेक भागांमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. कंत्राटी नोकर भरती विरोधातील शेवटचा मोठा मोर्चा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात मुंबई येथे होणार आहे.


लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विद्यार्थ्याचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसह  इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलं होतं. 


शाळा वाचवा, कंत्राटी नोकर भरती रद्द करा असे फलक हातात घेत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. देशभरातील खासगीकरण तात्काळ बंद करावे, कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या रद्द करा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे थांबवा, अनेक परीक्षा एक परीक्षा शुल्क, असे धोरण सरकारने स्वीकारावे आदी मागण्या करण्यात आल्या. 


शहरातील टाऊन हॉल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ह्या मोर्चास सुरुवात झाली होती. हे सर्व विद्यार्थी टाऊन हॉल पासून जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत चालत सभेच्या ठिकाणी दाखल झाला. या मोर्चास तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठा पाठींबा दिला होता.


वेगवेगळ्या परीक्षेसाठी हजारो रुपये फी आकारण्यात येत आहे.सर्व सामान्य शेतकरी परिवारातून येणाऱ्या विद्यार्थीच ही आर्थिक फसवणूक आहे. त्यातच पेपर फुटी सारखे प्रकरण होत असतात. या बाबत विद्यार्थ्यांत खूप मोठा असंतोष आहे. तोच आज रस्त्यावर दिसून येत आहे. सरकार साठी ही धोक्याची घंटा आहे असे मत प्रा.विठ्ठल कागणे यांनी व्यक्त केले आहे.


कंत्राटीकरणास जोरदार विरोध करणार...


आज देशातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र आशादायक चित्र नाहीये. मात्र ह्या देशातील तरुण आता जागृत होता आहे. त्याला सर्व प्रकारच्या स्थितीची उत्तम जाणीव आहे. ते विचार करत आहेत. गोरगरीब आणि वंचिताची ही मुले आता पेटून उठली आहेत.त्यांना सरकारची ध्यये धोरणे लक्षात येत आहे ..ते याच्या विरोधात उभे राहतील..यामुळे ह्या मोर्चाला ही गर्दी झाली आहे..देशात सर्वत्र हीच स्थिती आहे. आम्ही कंत्राटी करणास विरोध करणारच असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले.