Agriculture News : सोयाबीन संशोधन केंद्र ( Soybean Research centre) आणि देवणी, लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र लातूर (Latur) जिल्ह्यामध्ये प्रस्तावित होते, मात्र ते बीड जिल्ह्यात गेले आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे बीड जिल्ह्यामध्ये मंजूर झाले आहे. यामुळं लातूरमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्ह्यामध्ये कुठेही फिरु देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.


देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध


मागील अनेक वर्षापासून होणार होणार अशी चर्चा असलेले सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र लातूर ऐवजी बिडला झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध आहे. असे असताना प्राथमिकता लातूर ऐवजी बीडला देण्यात आली आहे. यामुळं लातुरात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवसासाठी बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्ह्यात फिरु देणार नसल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. त्यास काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे.


लातूरला इतर जिल्ह्यापेक्षा कमी निधी


औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मराठवाड्यातील विकासासाठी विविध प्रकल्प राबवण्यात आले होते. मात्र, यात लातूरकरांना अक्षरशः वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या आहेत. इतर जिल्ह्यापेक्षा कमी निधी तर मिळालाच मात्र लातूरचा हक्क असलेले सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी आणि लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र बीडला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं चर्चेला वेग आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर लातूरमध्ये सक्षम राजकीय नेतृत्व अस्तित्वात नसल्या कारणाने प्रस्तावित असलेले अनेक प्रकल्प आणि प्रोजेक्ट हे इतर जिल्ह्यात जाताना दिसत आहेत.


तात्कालीन कृषीमंत्री दादाजी भुसे आणि अब्दुल सत्तार यांनी दिलं होतं आश्वासन


दादा भुसे हे कृषिमंत्री असताना लातूरला सोयाबीन परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र मंजूर करण्याबाबतची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने शासकीय पातळीवरुन हालचालही झाली होती. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे लातूर येथे आले होते. त्यांनीही सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.


देवणी हे गाव देवणी वळूसाठी प्रसिद्ध 


लातूर जिल्ह्यातील देवणी हे गाव देवणी वळूसाठी प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यात देवणी वळू संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. मागील शेकडो वर्षापासून या भागात देवणी वळूबद्दल आस्था आहे.  संभाजी पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी देवणी येथे देवणी गोवंश संवर्धन केंद्रासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याचबरोबर जागा आरक्षित करण्यासंदर्भातील सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. मात्र सरकार बदललं त्यानंतर सगळं निर्णय थाबंले. त्यानंतर उदगीरचे आमदार आणि तात्कालीन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर येथे पशुसंवर्धन महाविद्यालयातच देवणी गोंवश संवर्धन केंद्र निर्माण करु अशी घोषणा केली होती. मात्र, सरकार बदलल्यनंतर त्यमध्येही काही झालं नाही. 


सरकारचे विस्तारीकरण लातूरकरांच्या मुळावर..


नवीन सरकार विस्तारीकरणात राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे झाले आणि लातूरकरांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याच्या भावना ठाकरे गटाने व्यक्त केल्या आहेत. सोयाबीन संशोधन केंद्र आणि त्याचबरोबर देवणी लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात नेलं. मागील अनेक वर्षापासून लातूरकरांनी या दोन संशोधन केंद्रासाठी प्रयत्न केले होते, घोषणाही झाल्या होत्या. मात्र, पदरी निराशा पडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.