लातूर: लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागात मृगाच्या प्रारंभी थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. या पावसाच्या भरवश्यावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर अद्याप पाऊस झालेला नाही. सध्या तर उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस नसल्याने अनेक भागात पिके कोमेजून जात आहेत तर काही भागात कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 101.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत झालेल्या पावसाच्या तुलनेत 188 मिमी पावसाची तूट आहे. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यासारखी पावसाची स्थिती धाराशिव, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही आहे. मराठवाड्यातील इतर चार जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाल्या असल्याने येथील स्थिती काही प्रमाणात बरी आहे.
दुबार पेरणीचे संकट गडद
सध्या सोयाबीनच्या पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. पुढील आठ दिवसात पाऊस झाला नाही तर लातूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील सोयाबीनचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती आहे. एका एकर सोयाबीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये खर्च करावा लागतो. दुबार पेरणी करायची झाल्यास तेवढाच खर्च पुन्हा करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे.
लातूर जिल्ह्यात मागील 28 दिवसापासून पावसाचा खंड आहे. पाच लाख 91 हजार हेक्टर पैकी पाच लाख 61 हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मुख्य पिक हे सोयाबीन चे क्षेत्र चार लाख 45 हजार 896 आहे. यात सरासरी पेक्षा जास्त पेरणी झाली आहे. 28 दिवसापासून पावसाचा खंड आहे पिकांनी माना टाकल्या आहेत. ढगाळ वातावरण मुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा फटका पिकांना बसत आहे. सोयाबीन लागवडी नंतर 25 ते 35 दिवसापर्यंत फुल धारणा होत असते..मात्र नेमके याच अवस्थेत पावसाने खंड दिल्याने त्याचा थेट परिणाम पिकाचा उत्पादनावर होणार आहे. या 28 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडला आहे मात्र तो बरसून काहीच उपयोग झाला नाही.
बीडमध्ये मध्यरात्री महिनाभराच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी
महिनाभराच्या विश्रांतीनंतर बीडसह परिसरातील तालुक्यात मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली असून जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसानंतर अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जून महिन्यात केवळ 59 टक्केच पाऊस झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे. जून महिना सुरू झाल्यापासून पावसाची गती एकदमच मंदावली होती. 30 दिवसांच्या कालावधीत सरासरी 11 दिवस पाऊस झाला, तर 19 दिवस पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातसुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून ते 14 जुलै या कालावधीत एकूण 80.09 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय. म्हणजेच जुलैमध्ये केवळ 30 मिलिमीटर पाऊस झाल्याचे या आकडेवारी वरून दिसून येत आहे.परंतु मध्यरात्री जवळपास दोन तास पावसाने दमदार हजेरी लावली जो पाऊस पिकांना दिलासा देणारा म्हणावा लागेल. जिल्ह्यातील पाणी प्रकल्प भरण्यासाठी जोरदार पाऊस अपेक्षित आहे.