Latur News : विनापरवाना झाड तोडणे (Tree Cutting) लातूरमधील (Latur) एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. लातूर महापालिकेने या व्यक्तीला एक लाख रुपयांचा दंड (Fine) तर ठोठावलाच, सोबतच पोलिसात तक्रारही दाखल केली. प्रशांत जाधव असं या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकाराची लातुरात चर्चा रंगली आहे.


काय आहे प्रकरण?


लातूर शहरातील सिग्नल कॅम्प भागात 23 वर्षापासून असलेलं झाड अवैधरित्या तोडण्यात आलं होतं. या भागातील प्रशांत जाधव यांच्या सांगण्यावरुन हे झाड तोडण्यात आलं होतं. ही बाब लातूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करत कारवाईही केली. संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने अवैधरित्या वृक्षतोड केली म्हणून एक लाख रुपयाचा आर्थिक दंडही केला आहे.


महापालिकेने पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हटलं?


याबाबत लातूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या वतीने प्रशांत जाधव यांना नोटीस पाठवून दंड ठोठावल्याबाबत माहिती दिली. या नोटीसमध्ये लिहिलं आहे की, "प्रशांत जाधव यांनी सिग्नल कॅम्प शिव नगर येथील मोठे काशिद या जातीचे वृक्ष लातूर शहर महानगरपालिका लातूर यांची पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे तोडल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कृत्य हे महाराष्ट्र (नागरीक्षेत्र) अधिनियम झाडांचे संरक्षण व जतन 1975 अधिनियमानुसार गुन्हा केला आहे. करिता आपणा एक लक्ष रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तरी वरील प्रमाणे दंडाची रक्कम चार दिवसांच्या आत लातूर शहर महानगरपालिकेमध्ये भरणा न केल्यास आपल्याविरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी."





मुंबईत बीएमसीचे कर्मचारी असल्याची थाप मारुन ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापलं


मुंबईत फेब्रुवारी 2021 मध्ये महापालिकेचे  कर्मचारी असल्याची थाप मारुन ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेला जाहिरातीच्या बॅनरचे जास्त पैसे मिळावे म्हणून काही जणांनी गिरगाव चौपाटीजवळ असलेलं ब्रिटिशकालीन वडाच झाड कापलं. स्थानिकांनी त्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आपण महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचं सांगितलं आणि हे झाड कापण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली असल्याचीही थाप त्यांनी मारली होती. परंतु तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत महानगरपालिकेला विचारणा केल्यावर बीएमसीने असा कुठलाही आदेश दिला नसल्याचं स्पष्ट केलं आणि झाड कापणारी लोक महापालिकेचे कर्मचारी नव्हते हे सुद्धा लक्षात आलं. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करुन माहिम परिसरातून पाच जणांना अटक करण्यात आली होती.


हेही वाचा


बीएमसीचे कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापलं, पाच जणांना अटक