लातूर : जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून पावसाने (Rain) हजेरी लावली असून सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं. अक्षरश: काही भागात, अरुंद गल्लींमध्ये जणून नद्या वाहत असल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही येथील पावसाच्या पाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. लातूर (Latur) शहरात जुना गाव भाग परिसरात या पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. जुन्या गाव भागामध्ये देशपांडे गल्ली, राम गल्ली, तेली गल्ली, माळी गल्ली, खडक हनुमान, सेंट्रल हनुमान यांसारख्या भागातील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये पावसाचं पाण्याने अक्षरशः नदीचे रूप घेतलं होतं. या गल्ल्यातील रस्ते दुथडी भरून वाहत होते. अनेक छोटी मोठी वाहन या पाण्यात वाहून गेली असून गल्ल्यातील नाले आणि रस्ता कोणता हे नागरिकांना कळत नसल्यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणेचं पसंत केलं होतं. दरम्यान, अहमदपूर तालुक्यात वीज पडून 2 शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटनाही काल घडली होती.   

सोमवारी आलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आपल्या गाड्या वाचवण्यासाठी गाडीमालकाची धडपड दिसून आली. तरुणांनी आपापले वाहनं कसे वाचवता येतील याकडे लक्ष दिलं. तब्बल दोन तास झालेल्या धुव्वाधार पावसाने या भागातील अनेक गल्ल्यात असंच चित्र निर्माण झालं होतं. लातूर शहरातील नांदेड रोडवरील इस्लामपुरा भागातील 120 घरात पावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांची मोठी धावपळ झाली आहे. या भागात पावसाचे पाणी तीव्र असल्याने अनेक घरात पाणी शिरले होते. गुडघ्याइतके पाणी घरात आल्याने घरातील सर्व साहित्य भिजून गेले आहेत. तर, घरातील फ्रिज लोकांनी उचलून सुरक्षित स्थळी ठेवल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे घरातील किराणा सामानही भिजून गेल्याने भूक भागविण्यासाठी चूल पेटवणं देखील नागरिकांना अवघड बनलं होतं. पावसाच्या पाण्याचा जोर आणि साचलेलं पाणी एवढं अधिक होतं की कोणतं सामान जमा करून ठेवावं आणि पाणी कसं बाहेर काढावे हेही लक्षात आलं नाही. 

दरम्यान, स्थानिकांकडून महानगरपालिका प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, वाहतूक खोळंबल्यामुळे वाहन आणि कर्मचारी इथे पोहोचायला उशीर लागला. तोपर्यंत नागरिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यातच, सतत पाऊस सुरू असल्याने पाणी कमी होण्याचं नावच घेत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

हेही वाचा

लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, 50 लाखांचं सोनं, मोठं घबाड; खिरोळकरकडं काय काय सापडलं?