लातूर :  ज्यांना स्वतःच्या गावाचा रस्ता करता आला नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. घरणी प्रकल्पातून पाणी चोरण्यासाठी ते आले होते त्यांना एक थेंब पाणी मिळणार नाही.  कोणत्याही व्यासपीठावर विकास निधी किती आणला याबाबत चर्चा करायला तयार असल्याचे जाहीर आव्हान  भाजप नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilengekar)  यांनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh)  यांना दिले आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.


निलंगा मतदारसंघामध्ये तीनशे किलोमीटर अंतर पायी चालत दहा दिवस चालणाऱ्या जन सन्मान पदयात्रा काढण्यात आली आहे . भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही पदयात्रा आयोजित केली आहे . जनसन्मान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि सुरेश धस लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे आले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आम्ही देशमुख यांच्यावर आक्रमकपणे टीका केली


संभाजी पाटलांची देशमुखांवर टीका 


ज्यांना स्वताच्या गावाचा रस्ता करता येत नाही त्यांनी विकासाची भाषा करू नये...माझ्याशी बोलायला ही येऊ नये..त्या भानगडीत ही पडू नये ..माझे जाहीर आव्हान आहे विकासासाठी आम्ही आणलेला निधी त्यांनी कधी आणला तरी का? आमदार अमित देशमुख यांनी त्याच्या गावात बाभळगावात तरी  रस्ते तरी केले पाहिजे. यांन पाणी पाहिजे होते तर हे घरनी येथे पाणी चोरण्यासाठी आले होते. जोपर्यंत संभाजी पाटील आहे तोपर्यंत एक थेंब ही बाहेर जाऊ देणार नाही. मी नम्र बोलतो, नतमस्तक होतो, वेळ आली तरी मस्तक बाजूला ही करतो. कोणत्याही व्यासपीठावर विकास निधी बाबत बोलायला तयार आहे, असे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. 


सुरेश धस यांची अमित देशमुखांवर टीका


कोविड काळात सगळ्यात जास्त मोठे होण्याची संधी अमित देशमुख यांच्याकडे होती मात्र त्यांनी काहीच काम केले नाही . आपल्या लक्षात राहिले ते फक्त टोपे साहेब.. औषधोपचार पैसा यापेक्षा जास्त आपुलकी धैर्य देणारा माणूस लागत असतो. अनेक रुग्ण फक्त आधार दिल्यामुळे नीट झाले आहेत. नेमकं याच काळामध्ये विलासरावांचे चिरंजीव कुठेच दिसले नाहीत. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबरोबर आम्ही काम केला आहे. विलासराव देशमुख यांचे वागणे बोलणे चालणे फार वेगळे होते. ते गुण पुढच्या पिढीत नाहीत..यातून तुम्हीच ओळखून घ्या ते काय आहेत.जे लोकांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत त्याच्या मागे लोकांनी जाऊ नये,  अशी खोचक टीका भाजप नेते सुरेश धस यांनी केली आहे.