लातूर : यंदा पाऊसकाळ चांगला असून हवामान खात्यानेही यावर्षी पाऊसकाळ (Rain) चांगला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, शेतकरी सुखावला असून मान्सुनच्या आगमनाने समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने उकाड्यापासून सुटका झाली असून अनेक जलप्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पहिल्याच पावसानंतर लातूरमधील (Latur) रेणा मध्यम प्रकल्पात तब्बल 20 ते 22 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहेत. रेणा नदीवरील चार बंधारे पाणी संचय पातळीवरुन वाहत आहेत. त्यामुळे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मांजरा नदीवरील वांगदरी या ठिकाणचे बॅरेजेस भरून वाहत आहेत, याबद्दल आमदार धीरज देशमुख यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.
लातूर जिल्ह्यात मागील 5 दिवसापासून दररोज पावसाची हजेरी आहे. मात्र, काल संध्याकाळी झालेल्या पावसाने संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे. रेणा मध्यम प्रकल्पात मूर्तसाठ्याच्या खाली पाणी गेलं होतं. त्यातच, काल आणि आज मिळून मूर्तसाठ्यापेक्षा वीस ते 22 टक्के पाणीसाठा वाढला आहे. रेणा नदी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई यातील घाटात उगम पावते. लातूर जिल्ह्यातील भंडारवाडी येथे या नदीवर मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे. इथून पुढे ही नदी मांजरा नदीला जाऊन मिळते. या नदीवर चार बंधारे बांधण्यात आले आहेत. या मांजरा नदीच्या बॅरेजेसमधूनही पाणी वाहू लागल्याने धीर देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव असलेले धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणमधून आमदार आहेत. त्यामुळे, गावाकडच्या मातीशी त्यांची नाळ कायम आहे. त्यातूनच, त्यांनी मांजरा नदीप्रकल्पातील पाणी पाहून आनंद व्यक्त केला आहे.
रेणा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लातूर, जिल्ह्यात 10 जून 2024 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारा येथील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्यावर गेली आहे. त्यामुळे रेणा नदी काठावरील गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान केंद्राद्वारे मुसळधार पावसाचा इशारा प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरील गावातील नागरीक, शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहिलेले नागरिक यांना लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील 24 तासात झालेले पर्जन्यमान
मागील 24 तासात लातूर जिल्ह्यात सरासरी 63.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल झालेला पाऊस जिल्ह्यात सर्वदूर पहावयास मिळाला. त्यामुळे, लातूरकर आणि बळीराजा सुखावल्याचं दिसून आलं. मागील 11 दिवसात लातूर जिल्ह्यात 136.08 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पर्जन्यमान 706.08 मिलिमीटर ची आहे.
लातूर तालुका ७७.७ मिलिमीटर
औसा 83.6 मिलिमीटर
अहमदपूर 41.2 मिलिमीटर
निलंगा 85.8 मिलिमीटर
उदगीर 16.2 मिलिमीटर
चाकूर 77.3 मिलिमीटर
रेनापुर 78.2 मिली मीटर
देवनी 24.6 मिलिमीटर
शिरूर अनंतपाळ 74.3 मिलिमीटर
दरम्यान, पावसाची स्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनांनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन सूचित करण्यात आलं आहे.