Latur News Update : लातूर जिल्ह्यातील उदगीर बस स्थानकाच्या भूमीपूजनावरून राष्ट्रवादी आणि भाजपचे आजी-माजी आमदार आमने-सामने आले आहेत. नव्या बस्थानकाचे श्रेय कोणी घ्यायचे यावरून दोघांमध्ये वाद सुरू झालाय. याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  


उदगीरच्या बस स्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे येथे नवीन बस स्थानक निर्माण करण्यासंदर्भातला निर्णय काही वर्षांपूर्वी झाला होता. 2019 मध्ये तत्कालीन भाजप आमदार सुधाकर भालेराव यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर सत्ता बदल झाला. त्यानंतर बराच कालावधी झाल्यानंतर देखील नूतनीकरणाच्या कामाने वेग घेतला नव्हता. आता राष्ट्रवादीचे  आमदार माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुन्हा भूमिपूजन सोहळा ठेवला आहे. मोठ्या प्रमाणात त्याची पेपरमधून जाहिरातबाजीही करण्यात आली आहे. उदगीर शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. यात सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांचाही उल्लेख नाही.  यामुळे संतप्त झालेले सुधाकर भालेराव यांचे कार्यकर्ते थेट सभास्थळी  पोहोचले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जे भूमिपूजन यापूर्वीच झाले आहे त्या ठिकाणी पुन्हा भूमिपूजन करण्याचे प्रयोजन का? निधी मंजूर झालाय तो त्यांच्या कार्यकाळात नव्हताच, मग त्याचे श्रेय का घ्यावे असा थेट सवाल भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केला आहे. 
 
भाजप कार्यकर्त्यांनी सभास्थळी एक प्रचंड गोंधळ घातला आहे. जोरदार घोषणाबाजी करत संजय बनसोडे यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी कोणतीही अनुचीत घटना घडून नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


भाजपाच्या काळामध्ये मंजूर झालेल्या अनेक योजना आणि निधी याचा वापर आजपर्यंत सुरू आहे. आमदार संजय बनसोडे यांनी त्यांच्या कार्यकाळात नवीन योजना आणली नाही किंवा निधी आणला नाही. मात्र भाजपाच्या काळातील निधी आणि योजनेचा वापर ते स्वतःच्या नावाने करत आहेत. ही बाब निषेधार्य आहे असं मत माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केलां आहे. 
 
भाजपच्या काळामध्ये काही गोष्टी झाल्या होत्या हे मान्य आहे. मात्र रखडलेल्या गोष्टीला पुन्हा मान्यता घेऊन निधी आणून काम नव्याने सुरू केले आहे. त्यामुळे हे भूमिपूजन केलं आहे. ते जर उदगीरच्या विकासात हातभार लावणार असतील तर त्यांनीही येऊन इथे नारळ वाढवला असता तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता असं मत राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे.