Latur News: लातूर शहरातील लॉजच्या खिडकीमध्ये बसलेल्या मुलीचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. दुसऱ्या माळ्यावरून पडलेली मुलगी विजेच्या तारेवर कोसळली. यातच त्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूरत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आद्या देशपांडे नावाची अकरा वर्षीय मुलगी ही मुळची हैदराबाद येथील आहे. लातूर येथील कार्यक्रमासाठी ती तिच्या मावशी बरोबर आली होती. दुपारी कार्यक्रम संपल्यावर त्या दोघी लॉज वर आल्या होत्या. आद्या लॉजच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. त्यावेळी तिला जिल्हा परिषद मैदानावरील व्हॉलीबॉल मॅच पाहण्याची इच्छा झाली. त्यामुळे ती खिडकीजवळ जाऊन बसली होती. खिडकी लॉक आहे निघणार नाही या विश्वासावर ती खिडकीला टेकून बसली होती.
मात्र, अचानक खिडकी उघडली गेली अन् आद्याचा तोल गेला. त्यामुळे आद्या ही दुसऱ्या मजल्यावरून ती खाली फेकली गेली. खिडकीच्या खालून विजेची तार गेली आहे. तिथेच विजेच्या तारेवर कोसळली. पुन्हा तिथून जमिनीवर आदळली. या अपघातात तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम त्या मुलीस उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं. तेथून लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर आद्यास मृत घोषित केलं आहे.
आद्याचा मृत्यू हा विजेच्या धक्क्याने झाला का डोक्याला इजा होऊन मृत्यू झाला याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर समोर येणार आहे. ही घटना घडल्यामुळे तिच्या मावशीला प्रचंड धक्का बसला आहे. आद्या देशपांडेचे वडील विनित देशपांडे आणि इतर कुटुंबीयांनी हैदराबादवरून तातडीने लातूरकडे धाव घेतली आहे. अकरा वर्षाच्या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हॉटेलची खिडकी बंद असताना अचानक निघाली कशी हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्थानिक पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आईला मारहाण करणाऱ्या बापाची 23 वर्षीय मुलाने केली हत्या
आईला सातत्याने मारहाण करणाऱ्या वडिलांना (Father) मुलाने अनेक वेळा समजावून सांगितले होते. मात्र आईला (Mother) होणाऱ्या मारहाणीत काहीही फरक पडला नाही. शेवटी मुलाने रागाच्या भरात वडिलांचा चाकूने भोसकून खून (Murder) केल्याची घटना लातुरात घडली. आरोपी मुलाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 3 जून रोजी ही घटना घडली.