कोल्हापूर : एक देश, एक निवडणूक होणार असेल तर काय चुकीचं होईल? या देशात आधी एकच इलेक्शन होत होतं ते तुम्ही बदललं आहात. तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार असं सांगता, अशी खोचक टीका मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil On Rahul Gandhi) यांनी केली. देशामध्ये एकदा निवडणूक झाली की विकासकामे करण्यासाठी वेळ मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. 


अजितदादा काय तक्रार करणार माहीत नाही


दरम्यान, एक देश एक निवडणूकसाठी केंद्रीय कॅबिनेटकडून मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आता विरोधकांकडून टीकास्त्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम समाजाविरोधात नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांविरोधात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे. वादग्रस्त विधानांबद्दल अजितदादा दिल्लीत काय तक्रार करणार मला माहित नसल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजितदादा यांनाच विचारलं पाहिजे की ते नेमकी कोणती तक्रार करणार आहेत. त्यांनी तक्रार केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी काय म्हटले हे त्यांनाच विचारा अशी भूमिका पाटील यांनी घेतली. 


24 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप संदर्भाने बोलताना पाटील यांनी सांगितले की, महायुतीमधील जागा वाटप संदर्भातील निर्णय आमचे त्रिमूर्ती घेतील. त्रिमूर्ती म्हणजेच आमच्या राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, 24 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती चंद्रक्रांत पाटील यांनी दिली. काल रात्री त्यांचा दौरा आल्याचे ते म्हणाले. एक देश एक निवडणूक मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. संजय राऊत काही बोलतील, त्यांचा हात कोण धरणार? असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या