Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) उद्या रविवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान होईल.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी 3740 बॅलेट युनिट आणि 2799 कंट्रोल युनिट आज देण्यात येतील. जिल्ह्यातील एकूण 1827 केंद्र म्हणून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून 9135 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली. मात्र, 45 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता 429 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. सरपंच पदासाठी 1193 तर सरपंचपदासाठी, तर सदस्य पदासाठी 8915 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे.
मतदान केंद्रांवर 144 कलम लागू
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात उद्या होणाऱ्या 429 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने मतदान केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध असेल.
पडद्यामागून हालचालींना वेग
दरम्यान, जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. त्यामुळे आता पडद्यामागून हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणूक होत असल्याने अत्यंत इर्ष्येने प्रचार झाला. थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने या पदासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आगामी विधानसभेसाठी गणित गृहित धरून आजी माजी आमदारांनी या निवडणुकीसाठी मोठी रसद पुरवली आहे. ज्या गावांमध्ये निवडणूक नाही त्या गावातील कार्यकर्तेही संवेदनशील गावांच्या प्रचारासाठी अखेरच्या दिवशी उतवरण्यात आले होते. अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचण्यसाठी शक्य त्या सर्व मार्गाने प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे गलोगल्ली रिक्षा, कार्यकर्ते प्रचाराच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरत होते.
इतर महत्वाच्या बातम्या