कोल्हापूर : विशाळगड हिंसाचारानंतर मुख्य आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. पुण्यातील हिंदू बांधव समितीचे अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर दोघेही फरार झाले आहेत. पडवळने केलेल्या आवाहनानंतर विशाळगड पायथ्याला पोहोचलेल्या शेकडो तरुणांनी तोडफोड करून दहशत माजवली होती. जमावाला चिथावणी देणारे पडवळ यांच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांची पथके पुण्याला रवाना झाली आहेत. दंगलीसाठी कारणीभूत ठरलेले पडवळ यांच्यासह दंगलखोरांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. संशयितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 


दोघांकडून दंगलीसाठी चिथावणी


विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले होते. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी चिथावणी दिल्याचे काही व्हिडितून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणा-यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.


पडवळ मोबाइल बंद करून पळाले


संशयितांच्या अटकेसाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत.  काही पथके रवींद्र पडवळ यांच्या मागावर पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, पडवळ हे मोबाइल बंद करून गायब आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बंडा साळोखे आणि त्यांच्या साथीदारांवरही अटकेची कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्याला मुंबईतून अटक


दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये कलम लागू केलं असतानाच जाता मुंबईतून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. विशाळगड हिंसाचारावरून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला मुंबईतील अंधेरीतून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद मासुम रजा शमीम शेख असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.विशाळगड हिंसाचार प्रकरणावरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा आशयाचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या