Kolhapur News: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर हद्दीत किणी टोल नाका आणि घुणकी फाट्यादरम्यान शनिवारी (27 मे) इर्टिगा कारने (एमएच-48एके- 6545) डोजरला मागून धडक दिली, या भीषण अपघातात तिशीतील दोन तरुणांचा मृत्यू झाला. इर्टिगामध्ये सहा तरुण होते. व्यवसायाला उभारी देण्यासाठी मुंबईत प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहिल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. शनिवारी पहाटे गावापासून हाकेच्या अंतरावर आले असताना इर्टिगाने मागून डोजरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीने दिशा बदलून पुन्हा पुण्याच्या दिशेने तोंड केले.
या अपघातात इर्टिगा कारमधील इतर चार जण गंभीर जखमी झाले. टोप, शिये व मिणचे येथील तरुण प्रदर्शन बघण्यासाठी मुंबईला गेले होते. राहुल अशोक शिखरे (वय 30, रा. मिणचे) व सुयोग दत्तात्रय पवार (वय 28, रा. टोप) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. सुनील कुरणे (वय 24), वैभव चौगुले (वय 23, सर्व टोप) तर अनिकेत जाधव (वय 22), निखिल शिखरे (वय 27, रा. मिणचे) जखमी आहेत. अपघातानंतर तरुणांनी मदतीसाठी आक्रोश सुरु केल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांनी आणि महामार्गावरील नागिरकांना त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. तथापि, राहुल आणि सुयोग यांनी उपचारापूर्वीच जगाचा निरोप घेतला होता.
तिशीतील दोन तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा
अपघातग्रस्त सर्व तरुण 20 ते 30 वयोगटातील आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघा तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी ते मुंबईत प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. मयत राहुल शिखरेचा अवघ्या दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याच्या मागे आई, विवाहित बहिण असा परिवार आहे, तर सुयोग पवारच्या मागे आई-वडील, पत्नी व बहीण असा परिवार आहे. सुयोग हा एकुलता एक होता. त्याचा विवाह मे 2022 मध्ये झाला होता. लग्नाचा वाढदिवस साजरा करून सुयोग मित्रांसमवेत मुंबईला गेला होता. मात्र, काळाच्या घाल्यात तो परतून आलाच नाही. अशीच काहीशी कथा राहुल शिखरेची आहे. त्याचाही दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पत्नीचा वाढदिवस सुरु करून तो गेला होता. त्याचीही कशा सुयोगप्रमाणे झाली आहे.
अपघात कसा घडला?
मुंबईहून प्रदर्शन बघून परतताना इर्टिगाने रोडरोलरला मागून जोरात धडक दिली. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका व घुणकी फाट्यादरम्यान शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. घुणकी फाट्याजवळ किणी टोल नाक्याच्या दिशेने चाललेल्या डोजरला धडक दिली. कारच्या धडकेत डोजर उलटला गेला, तर कारचा पुढील भाग चक्काचूर होऊन तोंड उलट दिशेने झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तसेच महामार्गावरील प्रवाशांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर तरुणांचे बचावासाठी एकच आक्रोश केला होता. डोजर चालक दादासो दबडे (वय 40, रा. वाठार) हे सुद्धा जखमी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या