Dhairyasheel Mane : राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर 12 खासदारांनी सुद्धा बंडखोरी करत त्यांचा गटात सामील झाले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचा समावेश होता. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात गेले. आता पहिल्यांदाच बंडानंतर हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने कोल्हापूर जिल्हामध्ये प्रथमच येत आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांनी बंडखोरी गेल्यानंतर मतदारसंघांमध्ये प्रथमच येत आहेत. त्यांच्या आगमनानंतर किणी टोल नाक्यावरून ते पेटवडगावपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. 

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात येणार आहे. किणी टोल नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पेठवडगांव असा रॅलीचा मार्ग आहे. 

ठाकरे कुटुंबाशी भावनिकदृष्ट्या आजही जोडला गेलो आहे


ठाकरे कुटुंबाशी भावनिकदृष्ट्या आजही जोडला गेलो आहे. आयुष्यभर ठाकरे कुटुंब माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे मत हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी काल एबीपी माझाशी बोलताताना व्यक्त केले. आपापसातील मतभेद थांबावे आणि सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो असेही माने म्हणाले. एखाद्या माणसाला घर सोडताना जो त्रास होतो, तशीच माझीही मनस्थिती झाल्याचे माने म्हणाले. पण राजकीय परिस्थिती आणि भविष्य पाहता जनतेशी असलेल्या बांधिलकीसाठी निर्णय घेतल्याचे मानेंनी सांगितले. जर काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात तर शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकत्र का नाही येणार असेही ते म्हणाले.


आदित्य ठाकरे आणि माझ्यातील जिव्हाळा हा राजकारणापलीकडील 


आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला वेळोवेळी भेट दिली. पण मी सुचवलेली, माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लागली नाहीत. केवळ एकच काम मार्गी लागल्याचे मानेंनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले नाहीत असे मी म्हणणार नाही, पण तीन लोकांचे सरकार असल्यामुळं त्यामध्ये काही अडचणी येत होत्या. असे माझ्याच बाबतीत नाही तर सर्वच खासदारांच्या बाबतीत घडल्याचे मानेंनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे आणि माझ्यातील जिव्हाळा हा राजकारणा पलिकडचा आहे. मी कायम त्यांच्यासोबत होतो असेही ते म्हणाले. राजकीय दुरावा निर्माण झाला म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो नसल्याचेही मानेंनी सांगितले.




धनुष्यबाणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवली, पण शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. पण परिस्थिती बदलली आणि आम्ही प्रवाहाबरोबर राहिल्याचे मानेंनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कालच सांगितले की, आमची युती नैसर्गिक नव्हती. हाच धाका प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात होता असेही माने यावेळी म्हणाले. बंडानंतर प्रथमच धैर्यशील माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खदखदीला एक वाट करुन दिला. माझ्या मतदारसंघात पूर येऊन गेला. मोठ्या प्रणाणावर लोकांचे नुकसान झाले. मात्र शासनाकडून योग्य तो निधी मिळाला नसल्याचे मानेंनी यावेळी सांगितले. आज राज्यात आणि केंद्रात एक सरकार असल्यामुळे त्याचा फायदा मतदारसंघाला होईल असेही यावेळी मानेंनी सांगितले. आमदार आणि खासदारांची गद्दारी कशी म्हणता येईल. सर्वसामान्य लोकांच्या मनातील ही खदखद असल्याचे माने यावेली म्हणाले.