Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौसर गरगरे या कुरुंदवाड येथील महिलेने सासरच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सासऱ्याच्या निवडणुकीसाठी तसेच पतीच्या व्यवसायाकरिता दहा लाख रुपये आणावेत, असा सातत्याने तगादा लावण्यात येत असल्यामुळे तिच्यावर मानसिक तणाव वाढत चालला होता, असा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीनुसार, कौसरचा सासरा राजमहंमद गरगरे, सासू मुमताज गरगरे, पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28 ) यांनी वारंवार आर्थिक मागणीचा दबाव टाकला. पतीच्या व्यवसायासाठी आणि सासऱ्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा भावाचा आरोप
या छळाला कंटाळून कौसरने आत्महत्या केली, असा संशय कौसरच्या भावाला आला. त्याने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली असून, तिच्या मृत्यूमागील परिस्थिती संशयास्पद असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत पती इंजमाम आणि जाऊ समिना यांना अटक केली आहे. तर सासू मुमताज आणि सासरा राजमहंमद गरगरे यांना अद्याप अटक केलेली नाही. या घटनेमुळे हातकणंगले-कुरुंदवाड परिसरात खळबळ उडाली असून, विवाहित महिलांवरील छळाचा आणखी एक हृदयद्रावक प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.
पतीकडून भलतीच फिर्याद, पण भावाच्या तक्रारीत उलघडा
फिर्याद मृत कौसर गरगरेचा भाऊ अल्ताफ इकबाल आवटी (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दाखल केली. 27 वर्षीय कौसरने गुरुवारी राहत्या घरी लोखंडी हुकास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेचा अभ्यास न झाल्याने ती तणावात होती व त्यातूनच तिने आत्महत्या केल्याची वर्दी पती इंजाजमने पोलिसांत दिली होती. दरम्यान, मुलीच्या आत्महत्येची माहिती समजताच जयसिंगपूर येथील माहेरहून मंडळी घटनास्थळी आली. त्यांना मुलीच्या आत्महत्येबाबत संशय आल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र कारवाईबाबत पोलिसांनी व स्थानिक लोकांनी समजूत घातल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, भावाने फिर्याद दाखल करताच घटनेला वेगळेच वळण मिळाले. मृत कौसरचे सासरे राजमहंमद राजकीय पक्षाकडून नगरपरिषद निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक खर्चासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी सासरकडून दहा लाख आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू होता, त्यास कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या