Hasan Mushrif : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातून भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमधून राष्ट्रवादीकडून तीन ते चारजण इच्छूक असल्याचा दावा केला आहे. मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादीकडून व्ही. बी. पाटील, चेतन नरके इच्छूक आहेत. तसेच अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे निवडणूका आल्यानंतर समजेल राष्ट्रवादीचे तिकिट कोणाला मिळालं आहे. चेतन नरकेंच्या उमेदवारी संदर्भात अरुण नरके यांनी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर विचारले असता मुश्रीफ म्हणाले की, लोकशाहीत उमेदवारीसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे. पवार आणि अरुण नरके यांचे जुने संबंध आहेत. आपण स्वत: विधानसभा लढणार असल्याचे ते म्हणाले.
मुश्रीफ यांनी यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या शिंदे गटाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्यावरून भाष्य केले. ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या आमंत्रणानुसार पंचगंगा आरतीसाठी गेले होते. मलाही आमंत्रण होते. मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नागपूरमध्ये विराट मोर्चा काढणार
दरम्यान, मुश्रीफ यांनी हिवाळी अधिवेशनात विराट मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. 19 तारखे पासून अधिवेशन सुरु होत आहे. या दिवशी राष्ट्रवादी नागपूरमध्ये विराट मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन हा मोर्चा असेल. सरकार येऊन 5 महिने झाले. मात्र, सर्व शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही. मदतीसाठी आचारसंहितेच्या कारणाची गरज नाही. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने पैसे दिले जातं नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.
सीमा भागातील लोकांवर अन्याय
कर्नाटकचे मुख्यमंत्री मराठी अस्मिता डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. कर्नाटकात भाजपची प्रतिमा खालावल्याने हा वाद उकरून काढला जात आहे. सीमा समन्वयकमंत्र्यांनी बेळगावमध्ये गेलं पाहिजे. आम्हाला बोलावल्यास आम्हीही यायला तयार असल्याचे ते म्हणाले. राज्यपालांविरोधात उदयनराजेंच्या भूमिकेचा आम्ही स्वागत करत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेस याबाबतीत त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या