Satej Patil on Hasan Mushrif : काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही काँग्रेस एकसंध आहे. जनतेच्या मनामध्ये विश्वासाचं वातावरण केवळ काँग्रेस देऊ शकतो. भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधी यांनी सामान्यांचा आवाज उठवण्याचे काम केले, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही. आम्ही राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. अधिवेशनामध्ये असेल किंवा भविष्य काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र राहू, असेही ते म्हणाले. 


महायुती सोबत जाण्याचा कोणताही प्रश्न नाही


कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) देखील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढणार आहेत. महायुती सोबत जाण्याचा कोणताही प्रश्न नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना सांगतो की महाविकास आघाडी एकसंध असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मुश्रीफ यांनी दिलेला महायुतीचा प्रस्ताव सतेज पाटील यांनी धुडकावून लावला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची राजकारणातील दोस्ती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दोघांनी कोल्हापुरात जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीमध्ये सत्ता स्थापन केली आहे.


कोल्हापुरातील एक जागा काँग्रेसला मिळावी ही आमची मागणी 


कोल्हापूर महानगरपालिकेला गेले दोन महिने आयुक्त नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, भाजपने दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचं की शिवसेनेने दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचं हा वाद आहे. मात्र, यांच्या वादामध्ये शहराचे प्रचंड नुकसान होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी ही आमची मागणी आहे. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे पहावं लागेल.  


काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, असं सरकारने ठरवलं आहे 


दरम्यान, यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं सरकारने ठरवलं आहे. शेतकरी अनुदान, शिक्षक भरती रायगड मधील घटना यावर सरकार बोलत नाही.  विरोधी बाकावरील आमदारांना सरकार निधी देत नाहीत. हे मंत्री राज्याचे नेतृत्व करतात की मतदारसंघाचे हा प्रश्न पडतो. 100 टक्के झुकतं माप सत्ताधारी आमदारांना देणे हे चूक आहे. 


कर्नाटकात तीन महिन्यांपासून विरोधी पक्षनेता देता आला नाही 


सतेज पाटील यांनी सांगितले की, राज्याचा मुख्यमंत्री मुंबईत ठरत नाही तर तो दिल्लीत ठरत असतो हे आता कळालं असेलच. भाजपला कर्नाटकमध्ये तीन महिने झाले तरी विरोधी पक्षनेता देता आलं नाही. मात्र, इकडे आम्ही तसं करणार नाही. लवकरच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून देण्यात येईल. 


इतर महत्वाच्या बातम्या