Bidri Sakhar Karkhana : राज्यात ऊस दरात 'लय भारी' अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून झाडाझडती करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रासह साखर कारखानदारांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. 


तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली


माजी आमदार के पी पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने ही झडती घेतली. अचानक आलेल्या पथकाने रात्रभर तपासणी केली आहे. प्रकल्पात असलेल्या त्रुटींची बाबत तपासणी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. 


कारवाई राजकीय हेतुने प्रेरित आहे का?


दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असतानाच बिद्री कारखान्यावर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून झडती घेण्यात आल्याने कारवाई राजकीय हेतुने प्रेरित आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


गेल्या हंगामात ऊसाला सर्वाधिक दर 


गेल्या हंगामामध्ये राज्यातील सर्वाधिक ऊसाला दर देण्याचा पराक्रम बिद्री सहकारी साखर कारखान्याने केला होता.  जिल्ह्यात सर्वाधिक सभासद असलेला हा सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कारखान्यांवर धाडसत्र कोल्हापूरमध्ये सुरू झालं आहे का? असा सुद्धा प्रश्न या कारवाईने उपस्थित झाला आहे.


के. पी. पाटलांची बिद्री कारखान्यावर एकहाती सत्ता 


दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत के. पी. पाटलांच्या पॅनेलने विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव करत एकहाती सत्ता अबाधिता राखली होती. दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा या निवडणुकीत निर्माण झाली होती. मात्र, बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली होती. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती.


इतर महत्वाच्या बातम्या