Dr. Homi Bhabha State University : राज्यातील पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागात वरिष्ठ प्राध्यापक डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षांसाठी डॉ. कामत यांची नियुक्ती केल्याचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केले.


छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अनुपम शुक्ल व शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता यांच्या समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कामत यांची निवड केली. 


दरम्यान, निवडीनंतर प्रतिक्रिया देताना कामत यांनी सांगितले की, कुलगुरूपदी झालेली निवड हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. शिवाजी विद्यापीठाचे  माझ्या प्रगतीमध्ये बहुमोल योगदान आहे. त्यांचे स्मरण करून नवी जबाबदारी स्वीकारत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी कुलगुरुपदाच्या कार्यकाळात प्रयत्न करेन. 


दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. डी.टी. शिर्के  यांनी कामत यांची झालेली निवड ही शिवाजी विद्यापीठ परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.  त्यांच्या अनुभवाचा भाभा विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये निश्चितपणे होईल. 


डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. केले असून गोवा विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 164 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर 15 पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. अध्यापन, संशोधन व प्रशासकीय कामकाज हाताळणीचा व्यापक अनुभव कामत यांना आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय व शासकीय विज्ञान संस्था या चार संस्थांचे मिळून डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठ स्थापन केले. मात्र तेव्हापासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंची नियुक्ती होऊ शकली नव्हती.