K. Chandrashekar Rao: गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्नशील असलेल्या आणि सत्ताधाऱ्यांच्या छुप्या मदतीने महाराष्ट्रात राजकीय दौरे करत असल्याचे आरोप होत असलेले तेलंगणाचे सीएम के. चंद्रशेखर राव पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी आता केसीआर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. केसीआर उद्या 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर येत आहेत.
कसा असेल केसीआर यांचा दौरा?
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या 1 ऑगस्ट रोजी हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर केसीआर यांचे आगमन होईल. त्यानंतर बाय रोड ते सांगलीमधील वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या साखराळे येथील घरी दुपारी दोन वाजता के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत. यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा हैदराबादकडे प्रयाण करतील.
रघुनाथदादा पाटील बीआरएसमध्ये प्रवेश करणार?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा हा कळीचा मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर केसीआर यांच्याकडून राज्यात पक्षवाढीसाठी शेतकरी नेत्यांनाच गळ घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनाही त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, शेट्टी यांनी त्यांची ऑफर नाकारली आहे. गेल्या काही महिन्यांपासून साईडलाईन झालेल्या शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी केसीआर भेट देणार आहेत. भोजनाचाही कार्यक्रम रघुनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे रघुनाथदादा पाटील केसीआर यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. रघुनाथदादा पाटील सध्याच्या राजकारणात पूर्णत: बाजूला गेले आहेत. त्यामुळे अब की बार किसान सरकार म्हणून वातावरण निर्मिती करत असलेल्या केसीआर यांच्या पक्षात प्रवेश करून आगामी वाटचाल करण्याची चर्चा सांगली जिल्ह्यात रंगली आहे.
कोल्हापूरमध्ये बॅनरबाजी
दरम्यान, केसीआर यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्यानंतर कोल्हापूरमध्येही काही दिवसांपूर्वी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. कोल्हापूर शहरातील सर्वच प्रमुख चौकामध्ये केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे बॅनर्स लागले होते. या पार्श्वभूमीवर उद्या सांगलीसह कोल्हापूरमध्येही काही राजकीय भेटीगाठी होणार का? याकडेही लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या