Kolhapur News: कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस (Kolhapur to Mumbai Sahyadri Express) तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. सह्याद्री एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरु आहेत. सह्याद्री एक्स्प्रेस गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने सातत्याने ही गाडी सुरु करण्यासाठी विविध स्तरातून मागणी सुरु आहे.

  


दोन वर्षांचा कालावधी लोटूनही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यात आलेली नाही


खासदार महाडिक यांनी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारणा आणि नव्या रेल्वे गाड्यांसाठी चर्चा केली. कोरोना काळात कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी लोटूनही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे, ही बाब खासदार महाडिक यांनी दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली. कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस तातडीने सुरू करण्याची मागणी केली.


मिरज ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मंजूर असूनही काही कारणास्तव हे काम रखडले आहे. त्याबाबतही खासदार महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. लवकरच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर कोल्हापूरहून आणखी काही नव्या रेल्वे गाड्या सुरू करता येतील, असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले. कोल्हापूर ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस किंवा वंदे भारत एक्स्प्रेस यासह अन्य काही नवीन मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, यासह कोल्हापूरच्या रेल्वे मागण्यांबाबत, खासदार महाडिक यांनी नामदार दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.


सह्याद्री एक्स्प्रेस त्वरित सुरू करा


दरम्यान, कोल्हापुरातून सुटणारी सह्याद्री एक्स्प्रेस गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. मात्र, सध्या महालक्ष्मी एक्स्प्रेस एकमेव गाडी सध्या मुंबईला जाणारी असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ज्या महिला मुंबईला जातात, त्यांना तर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस त्वरित सुरू करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीकडूनही करण्यात आली आहे. रेल्वे प्रबंधक विजयकुमार यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या