Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडेत एका शिक्षकाला महिलेचा नाद चांगलाच महागात पडला आहे. महिलेच्या घरी अनैतिक संबंधातून नातेवाइकांनी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नातलगांनी त्याला बेदम मारहाण करीत दोरीने बांधून घरातच बंद केले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजीतील एका प्रसिद्ध शाळेत कार्यरत असलेल्या या तरुण शिक्षकाचे संबंधित महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय घरच्यांना होता. अनेकदा ताकीद देऊनही परिस्थिती न बदलल्याने नातेवाइकांचा रंगेहाथ सापडताच उद्रेक झाला. शुक्रवारी सायंकाळी तो महिलेच्या घरी आल्याचे पाहताच घरच्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि नग्न अवस्थेत बांधून ठेवले.
पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून पोलीस ठाण्यात नेलं
प्रसंगाची माहिती पसरताच परिसरातील लोक मोठ्या संख्येने घरासमोर जमा झाले. काही नागरिकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या नातलगांनी गुन्हा दाखल करण्यावर ठाम भूमिका घेतली. वाढत्या जमावामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून शिरोळ पोलिसांनी मोठा बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात सुरक्षितरित्या हलवले.
स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून डोके फुटेपर्यंत हाणामारी
दरम्यान, कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीत बुधवारी रक्षाविसर्जनाला आलेल्या नातेवाइकांत काठ्यांनी डोकी फुटेपर्यंत हाणामारी झाली. यात इचलकरंजीचे चौघेजण जखमी झाले. अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्या काढून ही हाणामारी झाली. या हाणामारीत विकास रामचंद्र गेजगे, निवास रामचंद्र गेजगे, सुनंदा दगडू पारसे, पूजा दगडू पारसे हे चौघे जण जखमी झाले. अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे यांचे 25 नोव्हेंबर रोजी निधन झाले. मंगळवारीच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी रक्षाविसर्जनासाठी इचलकरंजीहून नातेवाईक आले. त्यावेळी मृत करडे यांच्या नणंदेच्या मुलांनी व इतरांनी ‘तुम्ही रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ अशी विचारणा केली. यावरून वाद सुरू झाला. शब्दाने शब्द वाढत जाऊन प्रकरण हमरीतुमरीवर आले. नंतर थेट काठ्यांनी मारहाण केली. दोन्ही बाजूकडून हाणामारी सुरू झाल्याने स्मशानभूमीत पळापळ झाली.
इतर महत्वाच्या बातम्या