कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये सभा पार पडल्यानंतर त्याला उत्तर सभा आज कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाकडून होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फुटीर अजित पवार गटातील सर्वच्या सर्व मंत्री उपस्थित आहेत. राष्ट्रवादीमधून बाहेर पडल्यापासून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले आहे. नुकत्याच झालेल्या बीडमधील उत्तर सभेमध्ये शरद पवारांवर थेट टीका त्यानंतर छगन भुजबळ यांना रोषाला सामोरे जावे लागले होते. कार्यकर्त्यांनी त्यांचे भाषण बंद पाडले होते. त्यामुळे कोल्हापुरात ते काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र शरद पवार यांच्यावर कोणतीही थेट टीका कोल्हापूरमधील सभेत छगन भुजबळ यांनी केली नाही. 


बीडमध्ये जे बोललो ते चुकीचं काहीच नव्हतं. फक्त माझे दुःख व्यक्त केलं होतं. दुःख व्यक्त करायचं नाही का? शरद पवार यांच्यावर टीका केली नव्हती, अशी प्रतिक्रिया आपले मनोगत व्यक्त करताना दिली. ते म्हणाले की, शाहू महाराजांचे पहिले राजे होते त्यांनी सर्वात पहिल्यांदा मागासवर्गीयांना आरक्षण दिलं. त्यांच्या नगरीत आम्ही आशीर्वाद घ्यायला आला आहोत. सभेसाठी झालेली गर्दी अजित पवारांसोबत असल्याची साक्ष देत आहे. 


पवार साहेब ज्यांना गुरू मानतात ते चव्हाण साहेब देखील अशाच पद्धतीने सत्तेमध्ये गेले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, मला माझ्या समाजासाठी सत्ता हवी आहे. आम्ही देखील आम्ही आमच्या समाजासाठी सत्तेत गेलो आहोत. लोकांची सेवा करणार आहोत. छगन भुजबळ यांनी सत्तेत का गेलो हे पटवून देण्यासाठी विविध दाखले देण्याचा प्रयत्न केला. कधी महात्मा फुलेंचा संदर्भ दिला तर कधी शाहू महाराज, तर कधी यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. मात्र, त्यांनी शरद पवारांवर टीका करणे टाळले. 


ते पुढे म्हणाले की, विविध समाजाला आरक्षण देण्याचं काम शरद पवार यांनी केलं ते विसरू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र,दुसऱ्या कोणत्या समाजाला दुखवू नका. आरक्षणामुळे जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी लागेल. भुजबळ यांनी जी 20 परिषदेचा संदर्भ पीएम मोदींचेही भरभरून कौतुक केले. 


इतर महत्वाच्या बातम्या